शिर्डी : साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगामी काही दिवसातच नाईट लँडींग विमानसेवा पूर्ण क्षमतेनं सुरू होईल. तसेच या विमानतळावरून देशांतर्गत सेवा वाढवण्याबरोबरच अंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे. सामान्य साईभक्तांना विमानसेवेचा लाभ घेता यावा, यासाठी शिर्डी एअरपोर्ट उडाण योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे, अशी माहिती केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांनी दिली.
शिर्डी विमानतळावर लवकरच नाईट लॅन्डींग :केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांनी शिर्डीत येवून साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं. दर्शनानंतर पत्रकारांशी संवाद साधताना केंद्रीय मंत्री मोहळ म्हणाले, "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटून शिर्डी एअरपोर्ट बाबतच्या अडचणी सोडवण्याबाबत विनंती केली. त्यानुसार अमित शाह यांनी मागील आठवड्यातच शिर्डी एअरपोर्टसाठी सीआयएसएफचे मनुष्यबळ वाढवून देण्याचे निर्देश दिले आहेत. नाईट लँडींगबाबत असलेल्या तांत्रिक अडचणी दूर करून पंधरा दिवसात शिर्डीतून विमानांची नाईट लँडींग आणि टेकऑप सुरू होईल."
नागरी उड्डाण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची घेणार बैठक :येत्या 6 तारखेला मुंबईत नागरी उड्डाण मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी यांच्या समवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आपल्या उपस्थितीत शिर्डीसह राज्यभरातील विनानतळाच्या अडचणी दूर करण्यासाठी ठोस निर्णय घेणार असल्याचे मुरलीधर मोहळ यांनी सांगितलं. "सध्या देशात सहाशे मार्ग उडाण अंतर्गत समाविष्ट करण्यात आले आहेत. त्यात शिर्डीचाही समावेश करता येईल. विठ्ठलाचे भक्त आणी तुळजापूरच्या भवानी मातेच्या भक्तांच्या सोयीसाठी सोलापूर - मुंबई विमानसेवा लवकरच सुरू करण्यात येणार आहे," असंही केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहळ यांनी सांगितलं. "देशातील सामान्य माणसाला विमानप्रवास करण्यासाठी मोदी सरकारनं 10 वर्षात देशात विमानतळांची संख्या 75 वरुन 175 वर नेली. विमानतळावर स्वस्त दरात भाविकांना भोजन नाश्ता देण्याची योजना कोलकत्ता विनानतळापासून सुरू केली आहे. त्याची व्याप्ती देशातील इतर विमानतळांवर वाढवणार आहे," असंही मोहोळ यांनी सांगितलं.
हेही वाचा :
- "प्रवाशांना सुविधा पुरवण्याच्या विमान कंपन्यांना सूचना, लवकरच परिस्थिती नियंत्रणात येईल" - Microsoft Outage Sparks
- पुण्याचं नाव खराब होईल असं वक्तव्य करु नये; 'त्या' वक्तव्यावरुन मुरलीधर मोहोळांचा राऊतांना इशारा - Murlidhar Mohol
- पुरंदरमधील नवीन विमानतळाकरिता ३५ एकर जागा घेऊन शेतकऱ्यांना ६० टक्के मोबदला देण्यात येणार-मुरलीधर मोहोळ - Pune New Airport