महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

साई प्रसादालयातील मोफत जेवणासाठी आता टोकन आवश्यक; वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर साईबाबा संस्थानचा निर्णय - SHIRDI SAI BABA PRASAD

शिर्डीतील वाढती गुन्हेगारी लक्षात घेता साई संस्थानच्या वतीनं मोठा निर्णय घेण्यात आलाय. साई प्रसादालयातील मोफत जेवणासाठी आता टोकन घेणं बंधनकारक असेल.

token required for free meals at sai baba mandir prasadalaya shirdi, decision taken ahead of increasing crime
साई प्रसादालयातील मोफत जेवणासाठी आता टोकन आवश्यक (ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 6, 2025, 11:30 AM IST

शिर्डी : साईबाबा संस्थान संचालित साई प्रसादालयाच्या नियमावलीत मोठे बदल करण्यात आलेत. मद्यपान आणि धुम्रपान करुन भाविकांना भोजन कक्षात त्रास देणाऱ्या अपप्रवृत्तींना आळा घालण्यासाठी प्रसादालयात टोकन पद्धत राबविण्याचा निर्णय संस्थानच्या वतीनं घेण्यात आलाय. साई दर्शनानंतर मोफत भोजन टोकन देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

आता टोकनशिवाय प्रसादालयात प्रवेश मिळणार नाही. तर, आजपासून (6 फेब्रुवारी) या नियमाची अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिलीय.

साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांची प्रतिक्रिया (ETV Bharat Reporter)

...त्यामुळं घेतला निर्णय : साई संस्थानचे मुख्य कार्यकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सांगितलं की, "शिर्डीत साईबाबा संस्थानच्या वतीनं आशिया खंडातील सर्वात मोठं भोजनालय चालवलं जातं. दिवसाकाठी सरासरी पन्नास हजार भाविक इथं मोफत साई प्रसादाचा लाभ घेतात. मात्र, त्याचबरोबर गुन्हेगारी प्रवृत्ती, अंमलीपदार्थांचं सेवन केलेली मंडळी, धुम्रपान करणारे काही व्यक्तीदेखील प्रसादालयात प्रवेश करुन भोजन करतात. यावेळी ते भाविकांना त्रास देत असल्याच्या अनेक तक्रारी साईबाबा संस्थानला प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळं साईबाबा संस्थानच्या वतीनं प्रसादालय प्रवेशावर काही निर्बंध घालण्यात आलेय."

टोकनचे पैसे घेतले जाणार की नाही? :पुढं ते म्हणाले, "साई मंदिरात दर्शन करुन बाहेर पडणाऱ्या भाविकांना उदी, बुंदी प्रसादाबरोबरच साई प्रसादालयातील मोफत भोजनाचे टोकन दिले जाणार आहेत. तसंच ज्या भाविकांना अगोदर भोजन करायचं असेल त्यांना प्रसादालयातच मोफत भोजनाचं टोकन देण्याची व्यवस्था करण्यात आलीय. निवास व्यवस्था, साईसंस्थानची दोन्ही रुग्णालयं येथील पेशंट आणि नातेवाईकांनादेखील टोकन दिले जाणार आहेत. तसंच शिर्डीत आलेला कोणताही भाविक उपाशी राहणार नाही. याचीही दक्षता साईबाबा संस्थानच्या वतीनं घेण्यात आलीय."

कर्मचाऱ्यांची हत्या : अलीकडेच साई संस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. त्यामुळं येथील प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर आल्याचं बघायला मिळतंय. याच पार्श्वभूमीवर शिर्डीतील गुन्हेगारी कमी करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत.

सुजय विखे पाटलांचं वक्तव्य : काही दिवसांपूर्वी भाजपाचे माजी खासदार सुजय विखे यांनी, "शिर्डीत देशभरातील लोक फुकट जेवायला येतात. महाराष्ट्रातील सर्व भिकारी इथं जमा झालेत," असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर साई प्रसादालयातील मोफत भोजन बंद करुन सशुल्क करावं, अशी मागणी झाली होती. मात्र, मोफत भोजन बंद न होता आता टोकन पद्धत सुरु झाल्यानं काही प्रमाणात प्रसादालयात भाविकाव्यतिरिक्त येणाऱ्या लोकांवर नियंत्रण राहील, अशी स्थानिक नागरिकांमधून अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा -

  1. शिर्डी साई संस्थानच्या कर्मचाऱ्यांच्या ड्युटीच्या वेळेत बदल; दुहेरी हत्याकांडानंतर महत्त्वाचा निर्णय
  2. शिर्डीत गुन्हेगारांचा उच्छाद! साई संस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांची हत्या, एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात
  3. शिर्डी साईबाबांसह शनिदेवाच्या चरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह नतमस्तक, पाहा व्हिडीओ

ABOUT THE AUTHOR

...view details