शिर्डी : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या साई संस्थान प्रसादालयातील भोजन आणि महाराष्ट्रीयन खाद्य पदार्थांच्या प्रेमात पडल्याचं बघायला मिळतंय. असं असतानाच आता शेंगदाणा चटणी, पुरणपोळीसह अन्य महाराष्ट्रीयन खाद्य पदार्थांची रेसिपी शिकवण्यासाठी साई संस्थानच्या आचाऱ्यांना राष्ट्रपती भवनात दुसऱ्यांदा निमंत्रित करण्यात आलं होतं.
यापूर्वीही दिले होते महाराष्ट्रीयन मेन्यूचे धडे : 7 जुलै 2023 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं होतं. त्यावेळी त्यांनी साई संस्थानच्या प्रसादालयात भोजनाचा आस्वाददेखील घेतला होता. यावेळी राष्ट्रपतींना जेवण आणि त्यातील शेंगदाणा चटणी विशेष आवडली होती. जेवणानंतर त्यांच्या आचाऱ्यांनी चटणीची रेसिपी जाणून घेत सॅम्पलही बरोबर नेले होते. त्यानंतर राष्ट्रपती भवनातील आचाऱ्यांना मराठमोळे पदार्थ शिकवण्यासाठी साई संस्थान प्रसादालयातील आचाऱ्यांना तिथं निमंत्रित करण्यात आलं होतं. त्यानुसार संस्थानने आचारी रविंद्र वहाडणे यांच्यासह पर्यवेक्षक प्रल्हाद कर्डीले यांना तिकडं पाठवलं होतं. 1 ऑगस्ट ते 23 ऑगस्ट 2023 दरम्यान या दोघांनी राष्ट्रपती भवनातील आचाऱ्यांना महाराष्ट्रीयन मेन्यूचे धडे दिले होते.
...त्यामुळं पुन्हा बोलावलं :राष्ट्रपती भवनातील यापूर्वी प्रशिक्षण दिलेल्या दोन आचाऱ्यांची बदली आणि एकाच्या सेवानिवृत्तीमुळं नवीन आचाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी संस्थान प्रसादालयातील आचाऱ्यांना पुन्हा राष्ट्रपती भवनात बोलावण्यात आलं होतं. त्यानुसार साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी या दोन्ही आचाऱ्यांना पुन्हा एकदा तिकडं पाठवलं होतं. अठरा दिवसानंतर ते आज परतलेत. गोरगरीबांची जिलेबी म्हणून ओळखली जाणारी कुळीदाची शेवंती, शेंगादाणा चटणी तसंच पुरणपोळी, बटाटा वडा, साबुदाणा वडा, कोथिंबीर वडी, मासवडी, मसाला वांगे, पालकभाजी, मुळ्याचा ठेचा, मेथीच्या भाजीसह महाराष्ट्रीयन भाज्यांचा तडका राष्ट्रपतींसह भवनानं अनुभवला.
साई संस्थानच्या दृष्टीनं गौरवाची बाब : "आयएसओ मानांकन असलेल्या आणि सामान्य भाविकांसाठी विनामूल्य असलेल्या साई संस्थान प्रसादालयात वर्षाकाठी जवळपास दीड-पावणे दोन कोटी भाविक भोजन करतात. एका दिवसात 90 हजार भाविकांच्या भोजनाचा विक्रम इथं झालाय. राष्ट्रपतींना भावलेले संस्थान प्रसादालयातील भोजन आणि मराठमोळे पदार्थ या निमित्तानं भारतभर रुजतील." तसंच महाराष्ट्र आणि साई संस्थानच्या दृष्टीनं ही गौरवाची बाब असल्याचं यावेळी साई संस्थानचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी सांगितलं.
हेही वाचा -
- Rashtrapati Bhavan : शिर्डीतील दोन आचाऱ्यांना थेट राष्ट्रपती भवनातून जेवण बनवण्यासाठी आमंत्रण