नांदेडAsha Shinde : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर नांदेड जिल्ह्यातील राजकारणाचं गणित पूर्णतः बिघडलं आहेत. काँग्रेस पक्षाला नांदेड जिल्ह्यात मोठे खिंडार पडले असले तरी काँग्रेस पक्षाला उभारी देण्यासाठी एक मोठा मासा काँग्रेस पक्षाच्या गळाला लागण्याची शक्यता आहे. नांदेड जिल्ह्यातील एक मोठं नाव लोहा-कंधार विधानसभेचे शेकापचे आमदार यांच्या पत्नी शेकपाच्या प्रदेशाध्यक्षा आशाताई श्यामसुंदर शिंदे ह्या काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
तर बहिण-भावामध्ये लढतीची शक्यता :आशाताई श्यामसुंदर शिंदे ह्या भाजपाचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या भगिनी आहेत. त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश झाल्यास येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत बहीण-भावाची लढत होणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान सध्या नांदेड जिल्ह्यात राजकीय उलथापालथींना वेग आलाय.
राजकीय समीकरणं बदलण्याची चिन्हं :शेतकरी कामगार पक्ष महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा आशाताई शिंदे या काँग्रेसच्या गळाला लागल्या आहेत. आशाताई शिंदे ह्या लोहा कंधार विधानसभेचे आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या पत्नी आणि भाजपा खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या त्या भगिनी आहेत. आशाताई शिंदे यांच्या काँग्रेस प्रवेशाने जिल्ह्यातील राजकीय समीकरणं बदलण्याची चिन्हं आहेत.
डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न :माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे भाजपावासी झाल्यानं नांदेडमध्ये काँग्रेसचा गड ढासळला आहे. काँग्रेसचे अनेक पदाधिकारी भाजपामध्ये प्रवेश करत आहेत. तर दुसरीकडे डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न केले जात आहेत. पुढील रणनिती आखायला काँग्रेसनं सुरुवात देखील केली आहे. त्यातच आता काँग्रेस पक्षानं शेकापच्या महिला प्रदेशाध्यक्षा आशाताई शिंदे यांना गळाला लावण्यात यश मिळवलं आहे. दरम्यान पक्ष प्रवेशानंतर काँग्रेसकडून आशाताई यांना मोठी जवाबदारी देणार असल्याची माहिती आहे.
आशाताई शिंदे यांचा राजकीय प्रवास :आशाताई शिंदे ह्या शेकापचे आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या पत्नी आहेत. मागील पाच वर्षांपासून त्या शेकाप मध्येत सक्रिय आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न असो किंवा लोहा मतदार संघातील समस्या त्या सोडवण्यासाठी नेहमी सक्रिय असायच्या. अनेक कार्यक्रमात पती श्यामसुंदर शिंदे यांच्या सोबत राहायच्या. विधानसभा निवडणुकीत पतीला निवडून आणण्यासाठी त्यांनी गावोगावी प्रचार देखील केला.
बहीण-भावामध्ये होणार लढत :आशाताई शिंदे ह्या भाजपा खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या भगिनी आहेत. मागील चार वर्षांपासून या बहीण-भावामधील कौटुंबिक वाद सर्वश्रुत आहे. कार्यक्रम आणि सभेतून दोघांनी एकमेकांना आव्हान देखील दिलं. दरम्यान विवाह सोहळ्याच्या निमित्तानं दोन्ही कुटुंब एकत्र आल्यानं व्यक्तिगत पातळीवरील वाद निवळला होता. मात्र, आता आशाताई शिंदे ह्या काँग्रेसमध्ये प्रवेश करत असल्यानं राजकीय वाद वाढण्याची शक्यता आहे.
हेही वाचा:
- 'माझ्या माहितीप्रमाणे अमित शाह यांना पंतप्रधान व्हायचं आहे'; संजय राऊत यांचा मोठा दावा
- प्रयागराजमधील प्रसिद्ध शाळेत विद्यार्थ्यांना दाखला देण्यासाठी महिला शिक्षिका बनली बनावट IAS, पोलिसांना फोन करून दाखवला धाक
- समीर वानखेडे यांच्या तक्रारीवरून IPS ज्ञानेश्वर सिंह यांच्याविरुद्ध न्यायालयात एटीआर दाखल