मुंबई : अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणात मुंबई आणि युपी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत पाच जणांना अटक केली आहे. यामध्ये मुख्य आरोपी शिवकुमार उर्फ शिवा या मुख्य शूटरचा समावेश असून तो यूपीच्या बहराइच मार्गे नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत होता. या पाचही आरोपींना सोमवारी मुंबईच्या किल्ला कोर्टात हजर केलं असता, त्यांना 19 नोव्हेंबरपर्यंत सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांच्याकडं करण्यात आलेल्या चौकशीत धक्कादायक खुलासे समोर आले आहेत.
हत्येनंतरचा काय आहे पूर्ण घटनाक्रम :बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी शिवकुमार गौतम याला रविवारी यूपीतील बहराइचमधून अटक करण्यात आली. त्यानंतर शिवकुमार याच्याकडं केलेल्या चौकशीत त्यानं बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणाशी संबंधित अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. बिष्णोई गँगनंच बाबा सिद्दिकी किंवा झिशान सिद्दिकी यांना ठार मारण्याचं काम दिलं असल्याचं त्यानं सांगितलं आहे. सिद्दिकी यांच्या हत्येनंतर त्यांची योजना उज्जैनला नंतर वैष्णोदेवीला आणि अखेर परदेशात पळून जाण्याची होती. परंतु ती योजना यशस्वी होऊ शकली नाही. मुंबईतून पळून जात असताना झारखंडला एका प्रवाशाच्या फोनवरून त्यानं त्याच्या सोबतचा सहआरोपी अनुराग कश्यप यांच्याशी संपर्क साधला. त्याचबरोबर गौतमचं शुभम लोणकर आणि झिशान अख्तर यांच्याशी हत्येपूर्वी आणि हत्येनंतर सुद्धा नियमित बोलणं होतं. चौकशी दरम्यान शिवकुमार ने हे सुद्धा सांगितलं की, 12 ऑक्टोंबरला बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर तो तिथून तत्काळ फरार झाला नाही. गोळी झाडल्यानंतर तो थोडा लांब गेला आणि त्यानं शर्ट बदललं. नंतर तिथं जमा असलेल्या गर्दीत घुसला. त्यानंतर थोड्या वेळानं तो रिक्षानं कुर्ला स्टेशनला पोहोचला. तेथून लोकलनं ठाण्याला आणि ठाण्यावरून एक्सप्रेस गाडी पकडून पहाटे तीनच्या सुमारास तो पुण्याला पोहोचला. त्यानंतर त्यानं आपला मोबाईल फेकून दिला.