अमरावती :शरद पवार कृषीमंत्री असताना विदर्भात सर्वाधिक आत्महत्या झाल्या. त्यामुळं शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची शरद पवारांनी माफी मागावी, असं म्हणत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शरद पवारांवर निशाणा साधला. नवनीत राणा यांना उमेदवारी दिल्याबद्दल शरद पवारांनी माफी मागितली होती. यावर अमित शाह यांनी शरद पवारांवर टीका केली. 10 वर्षे कृषिमंत्री असताना शरद पवारांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं? तुमच्या कार्यकाळात विदर्भात शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यामुळं अमरावतीकरांची माफी मागण्यापेक्षा शरद पवारांनी शेतकऱ्यांची माफी मागावी, अशी टीका अमित शाह यांनी केली. ते आज अमरावतीत नवनीत राणा यांच्या प्रचार सभेत बोलत होते.
370 हटवताच काश्मीरमध्ये शांतता :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीरमधील कलम 370 हटवलं. हा निर्णय घेत असताना राहुल गांधी यांनी कलम 370 हटल्यास काश्मीरमध्ये रक्तपात होईल, असा इशारा दिला होता. आज कलम 370 हटून पाच वर्षे उलटली. काश्मीरमध्ये रक्तपात, तर सोडा साधी दगडफेक देखील झाली नाही. काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी राजस्थान, महाराष्ट्रातील युवकांचा काश्मीरशी काहीही संबंध नसल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यांचं विधान दुर्दैवी असून महाराष्ट्रातला एकूण एक युवक काश्मीरसाठी पेटून उठणारा असल्याचं अमित शाह म्हणाले.
नवनीत राणांना मतदान म्हणजे राष्ट्राचा विकास :अमरावती लोकसभा मतदारसंघात नवनीत राणा यांना कमळ चिन्हावर मतदान करणे म्हणजे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मतदान करणे होय. नवनीत राणा यांना होणारे मतदान हे देशाला दहशतवादापासून मुक्त करणारे आहे. देशाला जगातील तिसरी आर्थिक महासत्ता बनविण्यासाठी नवनीत राणा यांना मतदान करायचं असून नवनीत राणा यांना मत म्हणजे देशाच्या विकासाला मत असल्याचं अमित शाह यांनी जाहीर सभेला संबोधित करताना म्हटंलय.