मुंबई Sharad Pawar Press Conference : लोकसभा निवडणूक 2024 मध्ये महाविकास आघाडीला राज्यात चांगलंच यश मिळालं आहे. तर दुसरीकडं देशातही 'इंडिया' आघाडी बहुमताच्या जवळ पोहोचली आहे. मात्र सत्ता स्थापन करण्यास 'इंडिया' आघाडीकडं बहुमताचा आकडा नाही. त्यामुळे आज 'इंडिया' आघाडीच्या घटक पक्षांची दिल्लीत बैठक होत आहे. या बैठकीला जाण्यापूर्वी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी शरद पवार यांनी "आज 'इंडिया' आघाडीची पहिलीच बैठक होत आहे. त्यामुळे या बेठकीत सामूहिक चर्चा करुन सत्ता स्थापनेच्या दाव्याबाबत निर्णय घेण्यात येईल," अशी माहिती दिली.
सत्ता स्थापनेच्या दाव्याबाबत ठरणार रणनीती :"'इंडिया' आघाडीची आज दिल्लीत बैठक होत आहे. काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी फोन केला होता. यावेळी त्यांनी बैठकीबाबत निमंत्रण दिलं. आज शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे येणार, की नाही याबाबत माहिती नाही. या बैठकीत सामूहिक चर्चा करुन सरकार स्थापन करण्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल. मी ज्येष्ठ असलो, तरी इतर सहकाऱ्यांशी चर्चा करण्यात येणार आहे. त्यानंतर सामूहिक रणनीती ठरवून सरकार स्थापन करण्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल," अशी माहिती शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.