मुंबई : उबाठा पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी महायुतीच्या उमेदवार सायना एनसी यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत शायना एनसी यांनी तक्रार दाखल केल्यामुळे अरविंद सावंत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र यावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांना विचारलं असता, त्यांनी अरविंद सावंत यांची पाठराखण केली. अरविंद सावंत यांचं वक्तव्य वैयक्तिक हल्ला होत नाही, मात्र महिलांबाबत बोलताना काळजी घेतली पाहिजे असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
अरविंद सावंत यांचं वक्तव्य व्यक्तिगत हल्ला होत नाही :उबाठा पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी महायुतीच्या उमेदवार शायना एनसी यांच्यावर बोलताना त्यांची जीभ घसरली. आमच्याकडं इम्पोर्टेड माल चालत नाही, तर आमच्याकडं फक्त ओरिजनल मालच चालतो, असं वादग्रस्त व्यक्तव्य अरंविद सावंत यांनी शायना एनसी यांना उद्देशून सांगितलं. यामुळे अरविंद सावंत यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहे. शायना एनसी यांनी आक्रमक होत अरविंद सावंत यांच्यावर तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरुन अरविंद सावंत यांच्यावग गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी दिवाळी पाडव्यानिमित्त शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी माध्यम प्रतिनिधींनी अरविंद सावंत यांच्या वक्तव्यावर शरद पवार यांची प्रतिक्रिया विचारली. त्यावर बोलताना शरद पवार यांनी, "अरविंद सावंत यांचं वक्तव्य हा व्यक्तिगत हल्ला होत नाही, असं दिसते. मात्र महिलांबाबत बोलताना काळजी घेतली पाहिजे," असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.