पुणे : राज्याचं नव्हं तर देशाचं लक्ष लागलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात काका विरुद्ध पुतणे अशी लढत होताना पाहायला मिळत आहे. एकीकडे अजित पवार तर दुसरीकडे शरद पवार यांच्या पक्षानं युगेंद्र पवार यांना उमेदवारी दिली आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (5 नोव्हेंबर) बारामतीत एक मोठं विधान केलं आहे. शरद पवार यांनी बारामतीत आयोजित सभेत संसदीय राजकारणातून निवृत्ती घेण्याचे संकेत दिले. ते बारामतीतील शिर्सुफळ येथील सभेत संबोधित करत होते.
बारामतीच्या जनतेनं चार वेळा मुख्यमंत्री केलं : 20 नोव्हेंबरच्या विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवार यांनी नातू, राष्ट्रवादीचे (एसपी) उमेदवार युगेंद्र पवार यांचा प्रचार करण्यास सुरुवात केली आहे. युगेंद्र पवार हे त्यांचे काका अजित पवार यांच्याविरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. शरद पवार म्हणाले, "बारामतीच्या जनतेनं मला चार वेळा मुख्यमंत्री केलं. तुम्ही मला 1967 मध्ये निवडून दिलं. महाराष्ट्रासाठी काम करण्याआधी मी 25 वर्षे इथे काम केलंय. बारामतीच्या जनतेनं माझी कधीच निराशा केली नाही. मी अजित पवार यांच्याकडं सर्व स्थानिक अधिकार आणि सर्व निर्णय सोपविलं होते. तसंच स्थानिक स्वराज्य संस्था, साखर आणि निवडणुकांचं नियोजन सोपवलं होतं."
किती निवडणुका लढवायच्या? : "मी लोकसभा लढवणार नाही तसंच कोणतीही निवडणूक लढवणार नाही. आत्ता किती निवडणुका लढवायच्या? आतापर्यंत 14 निवडणुका झाल्या त्यात जनतेनं मला एकदाही घरी बसवलं नाही, आता थांबायलाच हवं. नव्या पिढीनं आता पुढं यावं या सूत्रावर मी कामाला लागलोय. लोकांची सेवा आणि लोकांचं काम मी करत राहणार. गरीबांसाठी जे जे करता येईल ते करणार. हा निर्णय माझा स्वतःचा असून आत्ता आपल्याला निवडणूक नको, हे मी ठरवलं," असं शरद पवार यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं.