पुणे : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये महायुतीला जोरदार यश मिळालं आहे. मात्र या विरोधात ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांनी एल्गार पुकारत आत्मक्लेश आंदोलन सुरु केलं आहे. ईव्हीएममध्ये मतदारांनी मतदान कोणत्या पक्षाला केलं, याचा पुरावा काय, असा सवाल बाबा आढाव यांनी विचारला आहे. सरकारकडून मोठी लूट सुरू असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी त्यांच्या आत्मक्लेश आंदोलनाला भेट दिली, यावेळी बाबा आढाव हे बोलत होते.
शरद पवारांनी घेतली बाबा आढाव यांची भेट :राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी आज पुण्यात ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांची भेट घेतली. यावेळी शरद पवार यांनी बाबा आढाव यांच्या प्रकृतीची विाचरपूस केली. यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, की "विधानसभा निवडणूक 2024 च्या निकालानंतर नागरिकांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. विधानसभा निवडणुकीत सत्तेचा गैरवापर आणि पैश्यांचा महापूर याआधी कधीच पाहायला मिळाला नव्हता. तो या निवडणुकीत पाहायला मिळाला आहे. त्यामुळेच नागरिकांच्या मनात अस्वस्थता वाढली आहे. संसदेच्या बाहेर भेटलेल्या नागरिकांना जयप्रकाश नारायण यांची आठवण झाली. तसंच बाबा आढाव यांनी सुरु केलेल्या आंदोलनामुळे लोकांच्या मनात समाधान आहे," असं यावेळी शरद पवार म्हणाले.
निवडणूक आयोग इतक्या टोकाची भूमिका घेईल, असं वाटलं नाही :राज्यकर्त्यांकडून सबंध लोकशाहीवर आघात केला जात आहे. यामुळे आता नागरिकांच्यामध्ये जाऊन लोकांना जागृत करावं लागणार आहे. नागरिक जागृत होत आहेत. काही लोकांनी ईव्हीएमवर प्रेझेंटेशन आम्हाला दिलं होतं. त्यात 15 टक्के मत सेट करण या पद्धतीनं करणं शक्य होईल, असं दाखवण्यात आलं होतं. पण आमची कमतरता आहे की आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही. मात्र आता या गोष्टीत तथ्य आहे, असं दिसते. निवडणूक आयोग इतक्या टोकाची भूमिका अशा चुकीच्या पद्धतीनं घेईल, असं वाटलं नव्हतं. मात्र आता यात तथ्य आहे असं वाटते, असं यावेळी शरद पवार म्हणाले.
देशाची वाटचाल हुकूमशाहीकडं :ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव यांनी पुण्यात तीन दिवसांपासून आत्मक्लेश आंदोलन सुरु केलं आहे. आज ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बाबा आढाव यांची भेट घेतली. यावेळी बोलताना त्यांनी, "सरकारी पैशाची राज्यकर्त्यांकडून लूट सुरू आहे. राज्यात झालेल्या विधानसभा निवडणूक 2024 मध्ये ज्या पद्धतीनं पैश्यांचा वापर झाला आहे. ईव्हीएम आणि देशातील अदानी प्रकरणावर आम्ही तीन दिवस आत्मक्लेश आंदोलन करत आहोत. आपण पाहतोय की निवडणुकीत ईव्हीएममध्ये घोटाळा झाला. आज देशात लोकशाहीचं वस्त्रहरण करण्यात येत आहे. त्यामुळे आम्ही हे आत्मक्लेश आंदोलन करत आहोत. पुढं जाऊन सरकारच्या विरोधात सत्याग्रह देखील करणार आहोत. आदानीवर कारवाई झालीच पाहिजे, अशी आमची मागणी आहे," असं बाबा आढाव म्हणाले.
हेही वाचा :
- पुणे : रिंगरोड विरोधात बाबा आढाव यांच्या नेतृत्त्वाखाली शेतकऱ्यांचे आंदोलन
- सातारा : 'आबासाहेब वीर पुरस्कार' डॉ. बाबा आढाव यांना जाहीर ; हसमुख रावल यांना 'प्रेरणा पुरस्कार'
- ....आता कोथळा काढायची भाषा केली जाते; शरद पवारांनी नेत्यांची केली कानउघडणी