पुणे Sharad Pawar Criticizes Ajit Pawar: अजित पवार गटाला पक्ष व चिन्ह मिळाल्यानंतर काका व पुतण्यामधील वाद उफाळून आला."माझ्या विचाराचा खासदार निवडून दिला नाही तर मी विधानसभेला उभा राहणार नाही," असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीतील शेतकरी मेळाव्यात बोलताना केलं होतं. याविषयी ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणाले की, "याबाबत प्रत्येकाचा व्यक्तिगत विचार आहे. भावनात्मक अपील आमच्याकडून करण्याचं काही कारण नाही. बारामती मतदार संघाचे लोक आम्हाला वर्षानुवर्षांपासून ओळखतात. त्यामुळे आम्ही भावनात्मक अपील करणार नाही. मात्र ज्या पद्धतीनं विरोधकांकडून भूमिका मांडली जात आहे. त्या पद्धतीची भाषणं ही काहीतरी वेगळं सुचवत आहेत. त्याची नोंद सर्व मतदार घेऊन योग्य निकाल देतील", अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली.
कृषिमंत्र्यांनी केला हा गंभीर आरोप:राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी जितेंद्र आव्हाड यांना लक्ष्य करताना त्यांच्यावर गंभीर आरोप केला. दोन्ही पवारांच्यात जे अंतर पाडले ते जितेंद्र आव्हाड यांनी अंतर पाडले. जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे यांना बाजूला सारत जितेंद्र आव्हाड हे पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप त्यांनी केला होता. यासंदर्भात शरद पवार यांना प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी या आरोपाचं खंडन केलं.
शरद पवारांचा मुंडेंना टोला:शरद पवार म्हणाले की, "धनंजय मुंडे यांचा राष्ट्रवादीमधील कालखंड हा आव्हाडांपेक्षा जास्त आहे. त्यांनी देशपातळीवर, राज्य पातळीवर आणि संस्थात्मक पातळीवर काम केलं. महाराष्ट्राच्या विधिमंडळातही काम केलंय. राज्य मंत्रिमंडळामध्येसुद्धा त्यांनी काम केलं आहे. त्यामुळे पक्षाची भूमिका मांडण्याचा त्यांना अधिकार आहे. त्यांनी कोणतीही वेगळी भूमिका घेतली असं नाही. जितेंद्र आव्हाड यांनी काय बोलावं, याचं मार्गदर्शन अन्य लोकांनी करण्याची गरज नाही, असा टोलाही त्यांनी मुंडे यांना लगावला.