पुणे: शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी हिंदुराष्ट्रच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केलीय. यावेळी ते म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला हिंदुराष्ट्र म्हणून शकत नाहीत. संविधानाच्या सीमेत असं होऊ शकत नाही. लाचारीच्या परिस्थितीत मोदी हे हिंदू राष्ट्र घोषित करू शकत नाहीत. विकासाचं नाव घेता घेता विकासनेच त्यांना चितपट केलं. एका बाजूला नितीश कुमार आणि दुसऱ्या बाजूला नायडू यांच्या खांद्यावर हात ठेवून मोदींना चालावं लागलं. तसंच प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठापना केली, पण अयोध्येत पराभव झाला, इतरही अनेक ठिकाणी भाजपा हरलेली पाहायला मिळाली." पुण्यातील पत्रकार परिषदेत त्यांनी आपलं मत व्यक्त केलं.
वैदिक संविधानाचं नाव मनुस्मृती :यावेळी शंकराचार्य म्हणाले, "देशाला परिस्थितीनुसार सनातन सिद्धांताला मानावेच लागेल. सुसंस्कृत, सुरक्षित, सुशिक्षित, संपन्न हे हिंदू राष्ट्राचं स्वरूप आहे. वैदिक संविधानाचं नाव मनुस्मृती आहे. जीवनाचं सार्थक करण्यासाठी मनूने जे काही सांगितलं त्याचं पालन केलं पाहिजे. फक्त पोट आणि परिवारापर्यंत हिंदूंनी मर्यादित राहायला नको. तरच त्यांना योग्य तो सन्मान मिळेल".
क्रार्यक्रमात बोलताना निश्चलानंद सरस्वती स्वामी (ETV Bharat Reporter)
भारत हा विश्वगुरू आहे :निश्चलानंद सरस्वती पुढे म्हणाले, "हिंदू राष्ट्र होणं शक्य आहे. कारण आपले पूर्वज हे सनातनी वैदिक आर्य हिंदू होते. त्यामुळं भारत देशाला हिंदू राष्ट्र बनण्यासाठी कोणतीही अडचण नाही. भारत विश्वगुरू आहे. संयुक्त राष्ट्रासारख्या संघटनाही त्यांच्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी भारतात येतात. त्यामुळं भारत हा विश्वगुरू आहे".
याआधीही केलं होतं विधान: बिलासपूरमध्ये शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी धर्मसभेत आरएसएसवर जोरदार हल्ला चढवला होता. कोणाकडं बायबल आहे, कोणाकडं कुराण आहे, कोणाकडं गुरू ग्रंथ साहिब आहे, असे ते म्हणाले होते. पण आरएसएसचा कोणताही धर्मग्रंथ नाही. अशा स्थितीत ते कोणत्या आधारावर काम करणार आणि राज्य करणार, असा सवालही शंकराचार्यांनी उपस्थित केला होता. बिलासपूरच्या सीएमडी कॉलेजच्या मैदानावर शंकराचार्यांची मोठी धार्मिक सभा आयोजित केली होती. यावेळी शकराचार्यांनी लोकांची धर्मावरील श्रद्धा आणि देशाच्या स्थितीबद्दल भाष्य केलं होतं.
हेही वाचा -
- Shankaracharya on RSS: शंकराचार्य निश्चलानंद सरस्वतींची आरएसएसवर टीका.. म्हणाले, 'त्यांच्याकडे कुठलंही धर्मग्रंथ नाही'
- Dharma Sabha in Raipur: मी धर्मासोबत उभा आहे आरएसएस अन् मोहन भागवत यांच्यासोबत नाही -स्वामी निश्चलानंद सरस्वती
- Swami Nishchalananda : मोहन भागवतांकडे विज्ञानाचे ज्ञान कमी; स्वामी निश्चलानंद यांचे विधान