अमरावती : विदर्भातील थंड हवेचं ठिकाण आणि पर्यटनाचं प्रमुख केंद्र असणाऱ्या चिखलदरा येथे पर्यटक रममाण होतील अशी अनेक स्थळं आहेत. सातपुडा पर्वतरांगेत नौकाविहारचा खास आनंद पर्यटक चिखलदरा येथील शक्कर तलावात वीस वर्षांपासून घेत आहेत. पाणीपुरवठा विभागाच्या या तलावातून चिखलदरा शहराला पिण्याचं गोड पाणी पुरवलं जातं. पावसाळ्यासोबतच कडाक्याच्या थंडीत धुक्यामध्ये गुडूप होणाऱ्या सुंदर, स्वच्छ गोड पाण्याच्या तलावात नौका विहाराचा विशेष आनंद पर्यटक लुटतात.
वीस वर्षांपासून सुविधा : सातपुडा पर्वतरांगेत सर्वात उंच ठिकाणावर वसलेल्या चिखलदरा येथे गाविलगड किल्ला, देवी पॉईंट, भीम कुंड, पंचबोल पॉईंट, आमझरी अशी पर्यटकांना तासनतास खिळवून ठेवणारी स्थळं आहेत. या सर्व पर्यटन स्थळांचा आनंद घेत असतानाच गाविलगड किल्ल्याच्या मार्गावर तीन बाजूंनी असणाऱ्या पहाडांच्यामध्ये शक्कर तलाव आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत येणारा हा तलाव 2006 पासून चिखलदरा येथील रहिवासी जॉर्ज डेनियल यांच्या सिऑन बोटिंग अँड इको टुरिझम प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडं खास पर्यटकांच्या सुविधेकरिता सोपवला आहे. पायडल बोट, मशीन बोट, फॅमिली बोट, कपल बोट अशा पर्यटकांना हव्या त्या सुविधांनी युक्त विविध बोटी या ठिकाणी उपलब्ध असून पर्यटकांसाठी दरवर्षी नवीन लाइफ गार्ड आणले जातात. कंपनीच्या वतीनं बचाव पथक देखील या ठिकाणी तैनात असल्याची माहिती या तलावाचे व्यवस्थापक जॉर्ज डेनियल यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना दिली.
'या' दिवसात पर्यटकांची गर्दी : पावसाळ्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्यात चिखलदरा येथे पर्यटकांची सर्वाधिक गर्दी असते. नौकाविहाराचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येत शक्कर तलावावर येतात. यासोबतच दिवाळी, ख्रिसमस आणि ईद या तिन्ही सणाच्या पर्वावर पर्यटकांची गर्दी नौकाविहार करण्यासाठी उसळते. सातपुडा पर्वत रांगेत पर्वताच्या उंच टोकावर असणाऱ्या या तलावात नौकाविहारचा अनोखा अनुभव येतो असं काही पर्यटकांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितलं.