ठाणेSexual Assault On Minor Student : अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून अंबरनाथ पूर्वेतील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात शिक्षिकेच्या पती विरुद्ध भारतीय न्याय संहितासह पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करताच आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.
मुलीवर त्याची वाईट नजर :पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन विद्यार्थिनी अंबरनाथ परिसरात २६ वर्षीय आई आणि ३२ वर्षीय वडिलांसह राहत आहे. ती उल्हासनगर कॅम्प नंबर पाच भागातील एका इंग्रजी माध्यमिक शाळेत तिसऱ्या वर्गात शिक्षण घेत असून ती राहत असलेल्या अंबरनाथ पूर्वेतील परिसरातील एका खासगी शिकवणी वर्गात दोन वर्षांपासून जात होती. त्यातच या ठिकाणी खासगी शिकवण घेणाऱ्या शिक्षिकेच्या पतीची वाईट नजर या पीडित विद्यार्थिनीवर पडल्याने तो लैंगिक अत्याचाराची संधी शोधत होता.
मुलीवर केला लैंगिक अत्याचार :अशातच २१ जुलै रोजी (रविवारी) गुरु पौर्णिमा असल्याने खासगी शिकवणी वर्गात येणाऱ्या विद्यार्थ्यांना बोलावले होते. त्यानंतर शिकवणी घेऊन झाल्यानंतर वर्ग शिक्षिकेने पीडित मुलीला वरच्या खोलीतील वर्गात काही साहित्य नेण्यास सांगितले. त्यावेळी त्या वर्ग खोलीत शिक्षिकेचा आरोपी पती असल्याने पीडित मुलीने भीतभीत साहित्य नेले; यावेळी आरोपीने तिच्याशी अश्लील चाळे करत लैंगिक अत्याचार केला. या घटनेमुळे पीडित मुलगी भयभीत झाल्याने तिने हा प्रकार कोणाला सांगितला नव्हता; मात्र त्या दिवशी पाऊस जोरदार पडत असल्याने पीडित मुलीला घरी येण्यास उशीर झाल्याने तिचे वडील शिकवणी वर्गात येऊन तिला घरी घेऊन गेले.
पीडित मुलीने आईला सांगितला घडलेला प्रकार :घटनेच्या दिवशी रात्री घरात जेवण करत असताना अचानक पीडित मुलीने आई-वडिलांना सांगितले की, उद्यापासून मी शिकवणी वर्गात जाणार नाही. केवळ शाळेत जाणार असे बोलताच आई वडिलांना काही तरी आपल्या मुलीसोबत घडलं असा समज होऊन तिच्याकडे अधिक चौकशी केली असता हा धक्कादायक प्रकार समोर आला. खळबळजनक बाब म्हणजे, १९ जुलै ते २१ जुलै पर्यंत हा लैंगिक अत्याचाराचा प्रकार शिक्षिकेचा आरोपी पती करत असल्याचे पीडित मुलीने आईला सांगितले. त्यानंतर पीडित मुलीला घेऊन आईने २२ जुलै रोजी (सोमवारी) शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन घडलेला प्रसंग सांगितला. या आधारे पोलिसांनी शिक्षिकेच्या पती विरुद्ध गुन्हा दाखल केला तर गुन्हा दाखल झाल्याची कुणकुण लागताच आरोपी फरार झाला. पोलीस त्याचा शोध घेत असल्याची माहिती पोलीस ठाण्यातून देण्यात आली आहे. मात्र या घटनेमुळं पुन्हा एकदा खासगी शिकवणी वर्गातील विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
हेही वाचा:
- जळगावच्या जामनेर तालुक्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून खून; आरोपी फरार - Minor girl raped and killed
- चॉकलेटचे आमिष दाखवून शेजाऱ्याचा अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न, आरोपीला अटक
- घरकाम करणाऱ्या अल्पवयीन मुलीला पाईपने मारहाण; शिक्षिकेवर गुन्हा दाखल