मुंबई -मंत्री नितेश राणे यांच्या वक्तव्याचे पडसाद आता उमटत आहेत. शिवसेना (यूबीटी) आणि इतर विरोधी पक्षांच्या समर्थकांना त्यांच्या क्षेत्रांसाठी कोणताही विकास निधी मिळणार नाही असं विधान करणारे भाजपाचे मंत्री नितेश राणे यांना शिवसेना युबीटी पक्ष धडा शिकवेल असं माजी शिवसेना (यूबीटी) खासदार विनायक राऊत यांनी म्हटलं आहे. राणेंच्या डोक्यात सत्ता गेली आहे, असा दावा राऊत यांनी रविवारी संध्याकाळी पत्रकारांशी बोलताना केला. राणे आणि राऊत दोघेही कोकण भागातील नेते आहेत.
मंत्र्यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले, "राणेंच्या डोक्यात सत्ता गेली आहे. त्यांनी कर्तव्य बजावताना निष्पक्ष राहण्याची शपथ घेतली आहे. आम्ही लवकरच त्यांना धडा शिकवू." या महिन्याच्या सुरुवातीला सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना राणे म्हणाले होते की, विरोधी पक्षाच्या महाविकास आघाडी (एमव्हीए) आघाडीच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या मतदारसंघांचा विकास हवा असेल तर त्यांनी भारतीय जनता पक्षात सामील व्हावे.