पुणे : पुणे शहारत गेल्या काही दिवसांपासून गुलेन बारी सिंड्रोम म्हणजेच जीबीएस सिंड्रोम या आजाराचे रुग्ण हे वाढत आहेत. पुणे शहरातील जीबीएस सिंड्रोम रुग्णांची संख्या १११ वर पोहोचली आहे. अश्यातच पुणे विभागात आज जीबीएस मुळे दुसऱ्या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. दोन दिवसांपूर्वी सोलापूर येथे देखील पुण्यातील एका रुग्णाचा मृत्यू झाला होता.आता पुणे शहरातील सिंहगड रोड परिसरात राहात असलेल्या ५६ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे.
पुणे विभागात जीबीएस मुळे दुसरा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पुण्यातील महिलेचा जीबीएसमुळे आज मृत्यू झाला आहे. पुणे शहरातील सिंहगड रोड परिसरात राहात असलेल्या ५६ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून ही मृत महिला कॅन्सरग्रस्त होती. तसंच १५ जानेवारी रोजी ससून रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यानच या महिलेच्या मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे.
जीबीएस सिंड्रोमचे सर्वाधिक रुग्ण पुण्यात : जीबीएस सिंड्रोम या दुर्मीळ आजाराचं सर्वाधिक प्रमाण पुण्यात आहे. पाण्यावाटे आणि न शिजलेल्या अन्नावाटे हा आजार बळावतो. या रोगावर तत्काळ उपायोजना हाच उपाय आहे. कोल्हापुरात आढळून आलेल्या दोन रुग्णांमध्ये जीबीएस सिंड्रोमची लक्षणं आढळली आहेत.
अशी आहेत जीबीएस सिंड्रोमची लक्षणं :प्राथमिक लक्षणांमध्ये हाता-पायाला मुंग्या येणे, वारंवार येणारा अशक्तपणा, बोलताना आणि गिळताना होणारा त्रास अशी या रोगाची लक्षणं आहेत. तर, न शिजवलेलं अन्न आणि हॉटेलमधील पदार्थ टाळावेत असं आवाहनही यावेळी राजर्षी छत्रपती शाहू वैद्यकीय महाविद्यालयाकडून करण्यात आलं आहे.