नंदुरबार - जिल्ह्यातील दुर्गम भागात असलेल्या केलापानी गावात आजही रस्ते नाहीत. इथल्या आदिवासी बांधवांना पाण्यासाठी कसरत करावी लागते. रस्ता नसल्याने या आदिवासी गावकऱ्यांत गाढवाची मदत घेत 200 मीटर खोल दरीत असलेल्या नदीतून पाणी आणण्याची वेळ आली आहे. गाढवासोबत गाढव बनून पाण्यासाठी या आदिवासी बांधवांना दररोज 5 किलोमीटर पायपीट करावी लागत आहे. थंड हवेचं ठिकाण असल्याने तोरणमाळ नजीकच्या केलापाणी या गावाला रस्ता मंजूर असून तयार न झाल्यानं या गावकऱ्यांना मोठ्या समस्येला तोंड द्यावं लागत आहे. रस्ता नसल्यानं या आदिवासी बांधवांना वर्षभर पाणी, आरोग्य आणि शिक्षण या मुलभूत गोष्टींसाठी जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. तर महिलांना देखील घोटभर पाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पायपीट करावे लागत आहे.
सातपुडा तहानला - नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्ग अशा सातपुडा परिसरात आतापासूनच मोठ्या प्रमाणावर पाण्याची टंचाई भासू लागली आहे. थंड हवेचं ठिकाण असलेला तोरणमाळ परिसर येथे महिलांना घोटभर पाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पायपीट करावी लागत आहे. जीवाशी खेळ करून महिलांना खोल दरीत उतरून हंडाभर पाण्यासाठी सुमारे पाच ते सात किलोमीटर चालावं लागतं.