छत्रपती संभाजीनगर : गंगापूर खुलताबाद विधानसभा मतदारसंघात महायुतीचे आमदार प्रशांत बंब आणि पदवीधर आमदार सतीश चव्हाण यांच्यात थेट लढत होण्याची शक्यता आहे. या दोन्ही उमेदवारांनी विधानसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगानं गावोगावी दौरे आणि कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेणं सुरू केलं आहे. महायुतीकडून भाजपाचे आमदार प्रशांत बंब यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. महाविकास आघाडीकडून अधिकृत उमेदवाराची घोषणा झाली नसून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून आमदार सतीश चव्हाण यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. सर्वच समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न रखडत ठेवल्यानं आमदार सतीश चव्हाण यांनी प्रसिद्धी पत्र काढत सरकारवर नाराजी व्यक्त केली. त्यांमुळे त्यांना अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षातून निलंबित करण्यात आलं आहे. गंगापूर खुलताबाद मतदार संघात महायुतीत बंडाची शक्यता असून सतीश चव्हाण यांची शरद पवार गटाकडून उमेदवारी निश्चित मानली जात आहे.
प्रशांत बंब यांचा एकदा अपक्ष, तर भाजपाकडून दोनदा विजय :2019 च्या सार्वत्रिक महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार प्रशांत बंब विधानसभा निवडणुकीत विजयी झाले. प्रशांत बंब यांनी महाविकास आघाडीचे संतोष माने यांचा पराभव केला. प्रशांत बंब यांना 1,07,193 मतं मिळाली, तर संतोष माने यांना 72,222 मतं मिळाली.
2014 मध्ये भारतीय जनता पक्षाचे प्रशांत बंब यांनी शिवसेनेचे उमेदवार अंबादास दानवे यांचा 17,278 मतांनी पराभव करून या जागेवर विजय मिळवला. प्रशांत बंब यांना 55,483 तर अंबादास दानवे यांना 38,205 मतं मिळाली.
2009 च्या विधानसभा निवडणुकीत प्रशांत बंब, अपक्ष उमेदवार विजयी झाले. त्यांनी शिवसेनेचे अण्णासाहेब माने यांचा पराभव केला. बंब यांना 53067 मतं मिळाली तर माने यांना 29568 मतं मिळाली.
सतीष चव्हाणांमुळे स्थानिक पदाधिकारी नाराज :गंगापूर खुलताबाद विधानसभा मतदारसंघात सतीश चव्हाण यांचा शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी आहे. निष्ठावंतांना डावलल्यास काम करणार नसल्याचं महाविकास आघाडीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केलं. गंगापूर खुलताबाद मतदार संघातून महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे किरण पाटील डोणगावकर, ठाकरे गटाच्या देवयानी कृष्णा पाटील डोणगावकर, तर शरद पवारांच्या पक्षाचे डॉ ज्ञानेश्वर निळ, विलास चव्हाण हे निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. तसेच एमआयएम, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार किती मतं घेतात हे महत्त्वाचं ठरणार आहे.
या आहेत मतदारसंघातील समस्या :गंगापूर व खुलताबाद तालुक्यात ग्रामीण भागातील रस्ते, पाणी, विजेची समस्या कायम असून आमदार प्रशांत बंब यांच्यामार्फत अनेक रस्त्यांची कामं सुरू आहेत. अनेक विकासकामांचं भूमिपूजन झालं आहे. ग्रामीण भागातील बहुतांश रस्त्यांची दूरावस्था झाली आहे. पाणीटंचाईमुळे यावर्षी तालुक्यात 135 खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू होता. पाण्याची समस्या सोडवण्यासाठी तालुक्यात जलजीवन मिशन अंतर्गत गावागावात पाईपलाईनची कामं पूर्ण झाली. ही योजना कार्यान्वित झाल्यास मोठ्या प्रमाणावर पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. तसेच आमदार सतीश चव्हाण यांच्याकडूनही मतदारसंघात अनेक विकसकामं पूर्ण झाली असून अनेक कामांचं भूमिपूजन झालं आहे.
तालुक्यातील एकूण मतदार :