महाराष्ट्र

maharashtra

इमारतीवरून ढकलून प्रियकराकडून प्रेयसीची हत्या, गुन्हा दाखल - boyfriend killed girlfriend

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 1, 2024, 8:43 PM IST

Updated : Aug 2, 2024, 1:25 PM IST

कराडमध्ये वैद्यकशास्त्राचं शिक्षण घेणाऱ्या बिहारमधील तरुणीच्या मृत्यूमागचं धक्कादायक कारण समोर आलं आहे. प्रेमप्रकरणातून प्रियकरानं प्रेयसीची इमारतीवरून ढकलून हत्या केल्याचा आरोप आहे आणि पोलिसांनीही तशी माहिती दिली. या प्रकरणी प्रियकरावर गुन्हा दाखल करण्यात आला.

Karad medical college
कराड येथील मेडिकल कॉलेज (ETV Bharat Reporter)

सातारा : कराडमध्ये मंगळवारी रात्री (30 जुलै) वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणीचा मृत्यू झाला होता. या घटनेच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली. प्रेम प्रकरणातून प्रियकरानं प्रेयसीची इमारतीवरून ढकलून हत्या केल्याचा आरोप आहे. तसंच संशयितानं आत्महत्येचा बनाव केला. याप्रकरणी ध्रुव छिक्कार (रा. हरियाणा) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

तरुणीच्या मृत्युनंतर वैद्यकीय क्षेत्रात खळबळ : कराडमधील मेडिकल कॉलेजमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणीच्या मृत्युमुळं वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी कराडमध्ये दाखल झाले होते. याप्रकरणी पोलिसांनी अत्यंत गुप्तता पाळली होती. रात्री उशिरापर्यंत कराड शहर पोलीस ठाण्यात अधिकारी तळ ठोकून होते. मात्र, अधिकृत माहिती दिली जात नव्हती. रात्री उशिरा मृत तरूणीची आई कराडमध्ये दाखल झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.

प्रियकर-प्रेयसीमध्ये झटपट? : मूळची बिहारची असणारी 21 वर्षीय तरुणी तसंच ध्रुव छिक्कार हे दिल्लीत एकत्र शिकत होते. त्यानंतर दोघांनीही कराडच्या मेडिकल कॉलेजमध्ये वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला होता. ध्रुव हा मलकापूरमधील सनसिटीमध्ये राहात होता. मंगळवारी (30 जुलै) रात्री ध्रुवनं तरुणीला फ्लॅटवर बोलावून घेतलं होतं. त्यावेळी त्यांच्यात वादावादी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. रागाच्या भरात ध्रुवनं तरुणीला इमारतीवरून खाली ढकलून दिलं. त्यामुळं तिचा जागीच मृत्यू झाला, अशी माहिती कराड पोलिसांनी दिली. दरम्यान, तरुणानंही आत्महत्येचा बनाव केला. त्यात तो जखमी झाला असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

मीडिया ट्रायल होऊ न देण्याची खबरदारी : या प्रकरणात मीडिया ट्रायल होऊ नये, याची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी पुरेपूर खबरदारी घेतल्याचं दिसून आलं. घटना घडल्यानंतर पोलिसांनी प्राथमिक माहिती देण्यासही टाळाटाळ केली. त्यामुळं हे प्रकरण हायप्रोफाइल असल्याची शंका आली. अखेरीस गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी या घटनेची माहिती दिली.

Last Updated : Aug 2, 2024, 1:25 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details