मुंबई- खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड सीआयडी कोठडीत असताना विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि आमदार रोहित पवार यांनी बीड पोलिसांवर आरोप केले आहेत. बीडच्या पोलिसांकडून वाल्मिक कराडला खास सेवा दिली जात असल्याचा विरोधी पक्षाच्या नेत्यांनी आरोप केला.
विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी वाल्मिक कराडचे पोलीस ठाण्यात लाड सुरू असल्याचा एक्स मीडियावर पोस्ट करून आरोप केला. त्यामध्ये म्हटले, "महायुती सरकारच्या लाडके आरोपी योजनेत वाल्मीक कराड येत आहे. त्यामुळे बीड पोलीस स्थानकात नवीन पाच पलंग आले का?" असा प्रश्न विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी एक्स मीडियावरून उपस्थित केला.
हळुहळू त्याला सगळेच मिळणार-पुढे वडेट्टीवार यांनी म्हटले, "वाल्मीक कराड पोलीस कोठडीमध्ये असताना पाच पलांगांची आवश्यकता भासावी, इतके योगायोग चित्रपटातही नसतात. आरोपीचे लाड पुवण्याची ही सुरुवात आहे. हळूहळू टिव्ही, एसी, पंचतारांकित हॉटेलमधील जेवण सगळच मिळणार आहे".
पोलिसाकडून कराडची चौकशी की सेवा?विजय वडेट्टीवार यांनी पोलिसांच्या तपासाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले. वडेट्टीवार यांनी म्हटलं, " वाल्मीक कराडवर सरकारला निष्पक्ष कारवाई करायची आहे का? तसे असेल तर बीड जिल्ह्याच्या बाहेर चौकशी आणि तपास केला पाहिजे. त्यानं आजवर पोलिसांना धाकात ठेवले. ते पोलीस त्याची चौकशी करणार की सेवा? सरकारने कराडवर कारवाई करण्याचे नाटक एकतर बंद करावे. अन्यथा गांभीर्यपूर्वक कारवाई करा. कराडवर मकोका अंतर्गत गुन्हाही दाखल झालेलं नाही".
लहान आकाचा एन्काउन्टर होऊ शकतो-वडेट्टीवार- काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार माध्यमांशी बोलताना म्हणाले, " आरोपीवर कशाप्रकारे वेळेत आरोपपत्र दाखल करतात याची उत्सुकता आहे. एसआयटी हा केवळ फार्स ठरू नये. या प्रकरणाचा तपास भरकटविण्यासाठी एसआयटी नेमण्यात आली आहे. आधीच एसआयटी नेमायला हवी होती. वाल्मिक कराडचे लाड का केले जात आहेत. मोठ्या आकाला ( मंत्री धनंजय मुंडे) वाचविण्याकरिता लहान आकाचे (वाल्मिक कराड) एन्काउन्टर होऊ शकतो". विरोधी पक्षनेत्यांनी धनंजय मुंडेंबाबत दादांचे मौन पाहता मुंडेंची विकेट काढली जाऊ शकते. भुजबळांचा टीममध्ये समावेश केला जाईल का?
रोहित पवारांची बीड पोलिसांवर टीका-"पोलीस स्टेशनमध्ये स्टाफसाठी नवीन पलंग मागवल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलें आहे. मात्र, हेअचानक पलंग कसे मागवले? असे अनेक प्रश्न आहेत, असे राष्ट्रवादीचे (एसपी) आमदार रोहित पवार यांनी एक्स मीडियातील पोस्टमध्ये म्हटले. नवीन पलंग स्टाफसाठी मागवले असतील तर एवढीच तत्परता राज्यभरातील सर्वच पोलीस स्टेशनमधील स्टाफसाठी दाखवायला हवी. त्याचबरोबर उशी, पंखा, एसीदेखील बसवता येतील का, याचाही विचार करायला हवा," असा टोला रोहित पवार यांनी पोलिसांना लगावला आहे.
हेही वाचा-
- सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात एसआयटीची स्थापना, एसआयटीत सर्व अधिकारी बीडचे!
- संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक करा-मस्साजोगच्या ग्रामस्थांचे जलसमाधी आंदोलन