बीड :सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुलेच्या मोबाईलमधील डेटा रिकव्हर झाला आहे. तसेच विष्णू चाटेच्या मोबाईलमधील डेटा देखील सीआयडीनं शोधला आहे. त्यामध्ये महत्त्वाची माहिती मिळाली आहे. तसेच तपासात काही गोपनीयता पाळायच्या आहेत म्हणून ती माहिती दिली जात नाही. मात्र, तपास समाधानकारक सुरू आहे, अशी माहिती संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी दिली. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशमुख कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा, अशी मागणीही धनंजय देशमुख यांनी केली. संतोष देशमुख यांच्या हत्येला आज दोन महिने पूर्ण झाली आहेत.
मोबाईलमधील डेटा मिळाला : "संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आज 60 दिवस पूर्ण झाली आहेत. गेल्या काही दिवसापूर्वी विष्णू चाटेनी त्याचा मोबाईल फेकून दिला होता. त्यामधील डेटा मिळवण्यासाठी सीआयडी प्रयत्न करत होतं. त्याचबरोबर सुदर्शन घुलेच्या देखील मोबाईलचं लॉक उघडत नसल्यानं आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सीआयडी आणि एसआयटीनं ही माहिती आता रिकव्हर केली," अशी माहिती धनंजय देशमुख यांनी दिली.