मुंबई : बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत असून मंदिरावर हल्ले होत आहेत. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाहांना हिंदू केवळ मतांसाठी हवाय, असा हल्लाबोल उबाठा खासदार संजय राऊत यांनी केला. यावेळी त्यांनी पराभूत झालेल्या उमेदवारांवरुनही मोठं भाष्य केलं आहे. "ईव्हीएमवरुन आगामी काळात आंदोलन करण्यासाठी शरद पवार, उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांची एकत्र बसून चर्चा होईल, त्यानंतर आंदोलनाची दिशा ठरवण्यात येईल," असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार :बांगलादेशात हिंदूंवर मोठ्या प्रमाणात हल्ले होत आहेत. काही ठिकाणी मंदिरांची तोडफोड करण्यात आली आहे. यावरुनही उबाठा खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर हल्लाबोल केला. "बांगलादेशात मोठ्या प्रमाणात हिंदूंवर अत्याचार करण्यात येत आहेत. हिंदूंची मंदिरं पाडण्यात येत आहेत. मात्र अद्यापही सरकारनं याबाबत कोणतीही कारवाई केली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना हिंदू केवळ मतांसाठी हवे आहेत," अशी टीका संजय राऊत यांनी केली.