मुंबई Chhatrapati Shivaji Maharaj Statue : सिंधुदुर्ग इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा महायुती सरकारनं 8 महिन्यापूर्वी बसवला होता. पण हा पुतळा सोमवारी कोसळला. यावर विरोधकांनी टीका केली असून, शिवप्रेमीमधून संतापाची लाट उसळत आहे. हे राज्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं ओळखलं जातं... चालवलं जातं... परंतु ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची हानी झाली, ते पाहून आमच्या हृदयावरती घाव पडलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुका आणि मतं डोळ्यासमोर ठेवून घाईघाईनं महाराजांच्या पुतळ्याचं थाटामाटात उद्घाटन केलं. त्यावेळी सरकारला पुतळ्याचं अनावरण करू नका, असं सांगण्यात आलं. पण त्यांनी घाईघाईनं उद्घाटन केलं. त्यावेळी पुतळ्याच्या अनावरासाठी काही इतिहासकारांनी आक्षेप नोंदवला. स्वतः संभाजीराजे यांनीही पुतळ्याच्या अनावरणाला विरोध केला. शेवटी तो पुतळा पडला, हा आघात भरून न येण्यासारख्या आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जिथं हात लावतात, तिथं माती होते, असा जोरदार हल्लाबोल खासदार संजय राऊत यांनी केला.
पंतप्रधान मोदी हात लावतील तिथं माती होते : "देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जिथं हात लावतील तिथं माती होते. एक म्हण आहे "हात लावील तिथं सोनं". परंतु पंतप्रधान मोदींच्या बाबतीत असं नाही. पंतप्रधान मोदी जिथं हात लावतील तिथं चांगलं काही होत नाही. त्यांनी अयोध्या मंदिरांचं लोकार्पण केलं. तिथं गाभाऱ्यात पाण्याची गळती सुरू आहे. संसद भवनाचीही तीच अवस्था आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केलं. काल तो पुतळा कोसळला. त्यामुळे देशातील असे पहिले पंतप्रधान आहेत की, जिथं जिथं त्यांनी हात लावला, त्याची माती झाली आहे," अशी खोचक टीका संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली.
मोगलांनी असा अपमान कधी केला नाही :छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातही मोगलांनी त्यांचा कधी असा अपमान केला नव्हता. त्यांच्यावर अशी वेळ कधी आली नव्हती. आग्र्यातून महाराज स्वाभिमानानं तिथून आलं. पण त्यांच्यावर अशी कोसळण्याची आणि अपमानित होण्याची कधी वेळ आली नव्हती. परंतु त्याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात या सरकारनं त्यांच्यावर कोसळण्याची वेळ आणली आहे. याला सर्वस्वी जबाबदार पंतप्रधान नरेंद्र मोदी, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आहेत. पुतळ्याचं काम सार्वजनिक बांधकाम विभागानं केलं आहे. पुतळ्याचं काम एकनाथ शिंदेंनी स्वतःच्या मर्जीतल्या ठेकेदाराला दिलं. पुतळ्याचं बांधकाम, शिल्पकार आणि कंत्राटदार हे ठाण्यातील असल्याचं समजते. त्या ठेकेदारांनी शिंदेंना किती कमिशन दिलं? याचाही त्यांना हिशोब द्यावा लागेल, असा हल्लाबोल संजय राऊतांनी सरकारवर केला.