मुंबई : भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून गुरुवारी शपथ घेतल्यानंतर मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या आहेत. याबाबत बोलताना संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. महायुतीचा हा विजय ईव्हीएममुळे झाला आहे, बॅलेटवर निवडणुकी घ्या, असं आव्हान संजय राऊत यांनी दिलं. भाजपानं सुडाचं राजकारण सुरू केलं, त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्राचं काय होईल, असा सवालही संजय राऊत यांनी यावेळी केला. उद्धव ठाकरे यांच्या एक तर तुम्ही रहाल, नाहीतर मी, या वक्तव्यावरही संजय राऊतांनी भाष्य केलं.
महाराष्ट्र गुजरात भाऊ भाऊ :महाराष्ट्रातील अनेक उद्योग गुजरात राज्यात पळवण्यात आल्याचा आरोप संजय राऊत यांनी आज बोलताना पुन्हा केला. याबाबत बोलताना ते म्हणाले, की "महाराष्ट्रातील अनेक प्रकल्प गुजरातला पळवण्यात आले आहेत. वेदांत ऑक्सकॉन प्रकल्प, टाटांचा प्रकल्प आदी अनेक प्रकल्प गुजरातला पळवण्यात आले. खरं तर गुजरात आणि महाराष्ट्र भाऊ भाऊ आहेत. मात्र केंद्रातील नेत्यांनी या भावांचं नातं तोडलं. एकाच राज्यात उद्योग का पळवण्यात येतात, याबाबत ममता बॅनर्जी यांनी सवाल उपस्थित केले आहेत. अखिलेश यादव, तेजस्वी यादव यांनीही प्रश्न उपस्थित केले आहेत. आमचाही तोच प्रश्न आहे," असंही संजय राऊत यांनी यावेळी सांगितलं.
तृणमूल आंदोलनात नाही, त्यांची भूमिका वेगळी :महायुतीला मिळालेलं बहुमत हे ईव्हीएमच्या भरोश्यावर मिळालं आहे. बॅलेटवर निवडणुका घ्या, मग पाहू, असं संजय राऊत यांनी यावेळी सांगितलं. याबाबत आम्ही निवडणूक आयोग आणि न्यायालयात जाणार आहोत. मात्र जनतेनं आम्हाला विरोधी पक्ष म्हणून मान्यता दिली आहे. त्यामुळे आम्ही विरोधी पक्षाची भूमिका पार पाडू. अदानी प्रकरणात सुरू असलेल्या आंदोलनात ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचा सहभाग नाही. त्यामुळे कोणताही फरक पडत नाही. ममता बॅनर्जी यांची अदानी प्रकरणात भूमिका वेगळी आहे. आमच्या काही मित्रपक्षांची महाराष्ट्रातही भूमिका वेगळी आहे. धारावी प्रकरणात आमची भूमिका वेगळी आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
"एक तर तुम्ही राहाल, नाहीतर मी"वर काय म्हणाले संजय राऊत :विधानसभा निवडणूक 2024 च्या प्रचारात उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांनी जहरी टीका केली. राजकारणात एकतर तुम्ही राहाल, नाहीतर मी, असा जोरदार प्रहार उद्धव ठाकरे यांनी केला. यावर माध्यम प्रतिनिधींनी संजय राऊत यांना विचारलं असता, निवडणूक काळात अशी धाडसी वक्तव्य करावी लागतात. मात्र ती तितकीच असतात. देवेंद्र फडणवीस यांनी यावर बोलताना उद्धव ठाकरेही राजकारणात राहतील अन् मी देखील राजकारणात राहील, असं यावर सांगितलं आहे. त्यामुळे आम्ही विरोधी पक्षाची भूमिका पार पाडू, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
हेही वाचा :
- शपथ घेताच मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणींना दिली आनंदाची बातमी; 2100 रुपये देणार
- राज्यात 'देवेंद्र' पर्वाला सुरुवात; एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपमुख्यमंत्रिपदी विराजमान
- पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर अनेक आव्हानं