मुंबई :कल्याणमध्ये 13 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याची संतापजनक घटना घडली आहे. प्रकरण समोर आल्यानंतर सध्या कल्याण परिसरात तणावाचं वातावरण आहे. नागरिकांमध्ये संताप असून संबंधित आरोपीला फाशीच्या शिक्षेची मागणी केली जात आहे. सध्या पोलिसांनी आरोपी आणि त्याच्या पत्नीला बुलढाणा येथून अटक केली आहे. एका बाजुला बीड आणि परभणीतल्या हत्येच्या घटना चर्चेत असतानाच आता कल्याणमधील घटनेनं महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. या प्रकरणावरून खासदार संजय राऊत यांनी राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका केली आहे.
एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदेंवर टीका :याबाबत माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, "कल्याण अंबरनाथ हा उपमुख्यमंत्र्यांच्या लाडक्या चिरंजीवांचा जिल्हा आहे. त्यांनी वेगळा संसार थाटल्यापासून या जिल्ह्यात महिला अत्याचार, दरोडे, लुटमार, बलात्कार, महिलांच्या हत्या, धमक्या देण्याचे प्रमाण वाढले आहेत. या भागात गुंडाना अभय दिलं जातय. तिथले खासदार मतदारसंघात फिरत ही नाही. बदलापूरच्या अक्षय शिंदे प्रकरणानंतर हे भयानक प्रकरण आहे. बलात्कार खून करणारे हे बीड आणि कल्याणमध्ये का असतात? बदलापूरच्या प्रकरणात राजकीय फायद्यासाठी आरोपी अक्षय शिंदेचा महायुती सरकारनं एन्काऊंटर केला. आता कल्याणमध्ये चिमुकलीवर त्या गवळीनं अत्याचार केला, या प्रकरणावर देवेंद्र फडणवीस आणि ते खासदार गप्प का?" असा सवाल खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.