मुंबई - Temple Leaks in Ayodhya : संसदीय पावसाळी अधिवेनात लोकसभा अध्यक्षपदावरुन सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळताहेत. शिवसेनेचं (ठाकरे गटाचे) मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रातूनसुद्धा भाजपावर टीका करण्यात आली आहे. तर दुसरीकडे शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना मोदी-शाहा आणि एनडीए सरकारवर सडकून टीका केली.
अध्यक्षांनी लोकशाहीचा गळा घोटला- "लोकसभा अध्यक्ष या पदाला फार मोठी परंपरा लाभली आहे. मात्र मागील 10 वर्षात भारतीय जनता पक्षाचे हुकूमशाहीला मानणारे लोकं लोकसभा अध्यक्ष या ठिकाणी बसले आहेत. भारतीय जनता पक्षाच्या आधीच्या अध्यक्षांनी मागच्या वेळेला 75 ते 80 खासदारांना निलंबन करून लोकशाहीचा गळा घोटला होतं. त्यांनाच जाणीवपूर्वक पुन्हा त्या पदावर आणण्याचा प्रयत्न भाजपानं केला आहे. काल मोदींनी आणीबाणीची आठवण करून दिली होती. मात्र भाजपाच्या लोकसभा अध्यक्षांनी एकाच वेळी मोठ्या प्रमाणात खासदारांचे निलंबन केलं होतं. त्यांनाच तुम्ही पुन्हा अध्यक्ष म्हणून निवडले आहे. याला काय म्हणायचे?" असा सवाल राऊतांनी उपस्थित करत, 'यांचा सुंभ जळला तरी पीळ जात नाही...' अशी टीका राऊतांनी भाजपावर केली.
मोदींना पळ काढता येणार नाही-"नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना अटी-शर्ती कोण घालणार? या दोघांनी सर्वांना अटी शर्ती घातल्या आहेत. आता तर विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधी बसले आहेत. त्यामुळे मोदी-शाहांना रोज राहुल गांधीं नमस्कार घालूनच पुढे जावं लागेल," असा टोला संजय राऊत यांनी लगावला. "संसदीय अधिवेशनातून आता मोदींना पळ काढता येणार नाही. कारण आता त्यांच्यासमोर राहुल गांधी उभे ठाकले आहेत. आता त्यांना प्रत्येक प्रश्नाला उत्तर हे द्यावेच लागेल," असं संजय राऊत म्हणाले.