मुंबई Sanjay Raut On Farmer Protest : दिल्ली इथं सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावरुन शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीका केली. "केंद्रातील मोदी सरकार आता शेतकऱ्यांवर गोळीबार करण्याच्या तयारीत आहे," असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांच्या या आरोपावरुन आता राजकारण तापणार आहे. नव्यानं भाजपामध्ये दाखल झालेल्या अशोक चव्हाण यांना राज्यसभेवर पाठवलं. तर कोणताही संबंध नसताना एकनाथ शिंदे यांनी मिलिंद देवरा यांना तिकीट द्यावं, ही त्यांची सगळ्यात मोठी हार असल्याची टीकाही संजय राऊत यांनी केली.
ब्रिटिशांनीही अशी दडपशाही केली नव्हती :मुंबईत आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, "प्रधानमंत्री नरेंद्र मोदी परदेश दौऱ्यावर आहेत. एका मंदिराचं उद्घाटन त्यांनी केलं. या देशात अनेक गंभीर प्रश्न निर्माण झालेले आहेत. शेतकरी दिल्लीच्या दिशेनं लाखोच्या संख्येनं कूच करत आहेत. हमीभावासाठी शेतकरी देशाच्या राजधानीकडं येत आहेत. त्यांना रोखण्यासाठी दिल्लीच्या सीमेवर अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडल्या जात आहेत. पाण्याचे फवारे मारले जात आहेत. पोलीस गोळीबारासाठी सज्ज आहेत. रस्त्यावर खिळे ठोकलेले आहेत. वाहनं जाऊ नये, म्हणून अडथळे निर्माण करण्यात आले आहेत. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिशांनी सुद्धा अशा प्रकारची दडपशाही केली नव्हती. ती दडपशाही मोदी सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत करत आहे."
भाजपा फुगलेला बेडूक, तो कधीच बैल होणार नाही :खासदार संजय राऊत म्हणाले की, "मोदी सरकार आता शेतकऱ्यांवर गोळीबार करण्याच्या मनस्थितीत आहे. ही एक प्रकारची झुंडशाही आहे. देशाच्या हरित क्रांतीचे जनक स्वामीनाथन यांना तुम्ही भारतरत्न देता. याच स्वामीनाथन यांनी शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा, अशी मागणी केली होती. हेच नरेंद्र मोदी 2014 पासून सांगत आहेत, शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट केलं जाईल. पण, शेतकरी आपल्या पिकाला योग्य हमीभाव मिळावा, यासाठी आंदोलन करतो आहे, तर त्यांना तुम्ही रोखत आहात? लवकरच उद्धव ठाकरे एक पत्रकार परिषद शेतकऱ्यांच्या आंदोलनासंदर्भात घेऊन आपली भूमिका स्पष्ट करतील. दिल्लीतली शेतकऱ्यांच्या बाबतीतल्या भूमिकेच्या संदर्भात आम्ही निषेध व्यक्त करतो. भाजपा हा फुगलेला बेडूक आहे, तो कधीच बैल होणार नाही. जे शेतकरी दिल्लीच्या दिशेनं निघाले आहेत, त्यांना तुम्ही वेडे समजत आहात का?" असा प्रश्न खासदार संजय राऊत त्यांनी सरकारला विचारला आहे.
मागच्या आंदोलनात खलिस्तानी आता नक्षलवादी :नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणार असल्याचं आश्वासन दिलं होतं. याच आश्वासनांच्या मुद्द्यावर बोट ठेवत खासदार संजय राऊत म्हणाले की, "शेतकऱ्यांची मागणी काय आहे ? त्यांची मागणी शेतमालाला हमीभाव द्यावा आणि मोदी सरकारने जी वचनं दिलेली आहेत, उत्पन्न दुप्पट करायचं ती पूर्ण करण्यासंदर्भात त्यांची मागणी आहे. मागच्या आंदोलनात त्यांना खलिस्तानी केलं होतं. आता त्यांना तुम्ही नक्षलवादी ठरवलं आहे. अनेक ठिकाणी मोदी गॅरेंटी देत आहेत, पण, स्वतः मोदींची गॅरंटी नाही. याची तुम्हाला मी माझ्या पक्षाच्या वतीनं गॅरंटी देतो. ती गॅरंटी नसल्यामुळे प्रत्येक पक्षातील प्रमुख लोकं फोडून कशा जागा मिळवाव्यात ही त्यांची भूमिका आहे."
प्रफुल्ल पटेल यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार :महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी आता उमेदवारांची नावं समोर आली आहेत. या संदर्भात बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, "प्रफुल पटेल यांची साडेचार वर्षे शिल्लक असताना ते परत निवडणुकीला उभं राहिले. या देशांमध्ये आधी असं घडलं नव्हतं. प्रफुल पटेल यांच्यावरील अपात्रतेची टांगती तलवार आहे आणि ते अपात्र ठरू नये, यासाठी अजित पवार यांच्या गटात पुन्हा एकदा राज्यसभेची उमेदवारी घेतली. अशोक चव्हाण आणि त्यांच्या गटानं चंद्रकांत हंडोरे यांना क्रॉस वोटिंग केलं. एका दलित चेहऱ्याला मतदान करून त्यांना राज्यसभेवर पाठवणं अत्यंत महत्त्वाचं होतं. त्यासाठी आम्ही त्यांना पाठिंबा दिला आहे. भाजपाकडून निष्ठावंतांना सतरंज्या उचलायला लावायच्या आणि बाहेरच्यांना उमेदवारी द्यायच्या, यासाठी आम्ही त्यांचं अभिनंदन करतो."
आधी भ्रष्टाचार करा, मग पक्ष फोडा :आज विधान भवनात अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी होणार आहे. यासंदर्भात राऊत म्हणाले की, "उद्या अशोक चव्हाण यांनी जरी काँग्रेसवर दावा सांगितला असता, तरी देखील त्यांच्याच बाजुनं निकाल लागला असता. मोदींची हीच गॅरंटी आहे. आधी भ्रष्टाचार करा मग पक्ष फोडा आणि मग आमच्याच पक्षाच्या मूळ पक्षावर दावा करा. तुमचा जन्म त्या पक्षात झाला नसला, तरी त्या पक्षावर दावा करू शकता. ही एकमेव मोदी गॅरंटी आहे. अशोक चव्हाण यांचं मी अभिनंदन करतो, की त्यांनी शिंदे आणि अजित पवार यांच्याप्रमाणं दावा सांगितला नाही. जर त्यांनी हा दावा सांगितला असता, तर त्यांना देखील पक्षाचं चिन्ह मिळालं असतं आणि नाव देखील मिळालं असतं."
हेही वाचा :
- मुख्यमंत्र्यांची कॅबिनेट अंडरवर्ल्ड गँग चालवते; संजय राऊतांचा गंभीर आरोप
- मुख्यमंत्र्यांच्या दाढीवरुन राजकारण तापलं; चक्क रावणाचीही दाढी काढली