मुंबई Sanjay Raut Demand Arrest To Fadnavis : पुणे इथं भाजपाचा रविवारी कार्यकर्ता मेळावा पार पडला. हा मेळावा दोन गृहमंत्र्यांच्या भाषणामुळे चांगलाच चर्चेत आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यातील मराठा आरक्षणावरून शरद पवार, उद्धव ठाकरे, राहुल गांधी यांच्यावर टीका केली. तर, राज्याचे उपुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपावर टीका करणाऱ्यांना 'ठोकून काढा' असं म्हणत महाविकास आघाडीवर टीका करण्याची सर्व कार्यकर्त्यांना खुली सूट दिली. त्यामुळे दोन्ही गृहमंत्र्यांनी आपल्या भाषणात वापरलेल्या भाषेमुळे संजय राऊत यांनी या दोन्ही गृहमंत्र्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. ठोकून काढा या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावरुन त्यांना तत्काळ अटक करा, असा हल्लाबोल उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला.
खासदार संजय राऊत (Reporter) 'ते' देशाचे गृहमंत्री आहेत हे सांगायला आम्हाला लाज वाटते :रविवारी भाजपाच्या महाराष्ट्र अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. या टीकेला उत्तर देताना संजय राऊत म्हणाले की, "अमित शाह देशाचे गृहमंत्री आहेत, हे सांगायला आम्हाला लाज वाटते. अमित शाहांनी ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते, ते अशोक चव्हाण आज अमित शाहांच्या शेजारी बसलेले दिसतात. यांच्याच भाजपा सरकारनं शरद पवारांना पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित केलं आहे. खुद्द पंतप्रधान मोदींनी त्यांचं कौतुक केलं आहे. आज तेच अमित शाह शरद पवार यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. मला वाटतं पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शाह यांच्यात काहीतरी बिनसलं आहे. त्यामुळेच हे मतभेद दिसत आहेत."
उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबे नेते :अमित शाह यांनी याच सभेत उद्धव ठाकरे यांना औरंगजेब फॅन क्लबचे नेते अशी उपमा दिली. ज्यांनी कसाबला बिर्याणी दिली, त्याच लोकांच्या मांडीला मांडी लावून उद्धव ठाकरे बसले आहेत, अशी टीका अमित शाह यांनी केली. याला उत्तर देताना खासदार संजय राऊत म्हणाले की, "पाकिस्तानात जाऊन जिनांच्या कबरीवर फुलं उधळणारे आम्ही नक्कीच नाही. किंवा पाकिस्तानात जाऊन नवाज शरीफ यांच्या वाढदिवसाच्या केक कापण्यात आणि खाण्यात आम्हाला कधीच इंटरेस्ट नाही. या देशातल्या देशभक्त आणि स्वाभिमानी मुस्लिमांची बाजू मांडणं यात काही गैर नाही. देशाच्या संघर्षाच्या काळात अनेक मुस्लिमांनी देखील बलिदान दिलं आहे. यांनी कितीही शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली तरी, गुजरातच्या व्यापाऱ्यांना आम्ही महाराष्ट्र लुटू देणार नाही. हा संदेश राज्याच्या जनतेनं अमित शाह यांना दिलेला आहे."
महाविकास आघाडीवर टीका करण्यासाठी खुली सूट :याच सभेत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व कार्यकर्त्यांना महाविकास आघाडीवर टीका करण्यासाठी खुली सूट दिली आहे. यावेळी त्यांनी 'आपल्यावर टीका करणाऱ्यांना ठोकून काढा' अशी भाषा वापरली. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, "राज्यात 'पैसा फेक तमाशा देख' या पद्धतीचं राजकारण सुरू आहे. आम्ही वीस आमदार फोडले, हे देवेंद्र फडणवीस अभिमानानं सांगतात. खरंतर त्यांची ईडी आणि सीबीआय चौकशी व्हायला हवी. हे 20 आमदार तुम्ही चिचोके देऊन फोडले का? महाविकास आघाडीतले आमदार तुम्ही कशाच्या जीवावर फोडलेत? भाजपा भ्रष्टाचाराला आपला विरोध आहे, असं दाखवते. मात्र, हे आमदार फोडण्यासाठी पैसा कुठून आला, याची चौकशी व्हायला हवी. देवेंद्र फडणवीस यांना तातडीनं अटक करा आणि त्यांची चौकशी करा" अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
हेही वाचा :
- "शरद पवारांनी मराठा समाजाला आरक्षण का दिलं नाही? वाजपेयी, मोदींमुळं आरक्षण..."- देवेंद्र फडणवीस - Devendra Fadnavis
- 'डुप्लिकेट लोकांना डुप्लिकेट मालाचं आकर्षण...' - संजय राऊत - Shivaji Maharaj Waghnakh
- देवेंद्र फडणवीस -अजित पवारांचं हेलिकॉप्टर भरकटलं : अजित पवारांनी सांगितला थरारक अनुभव - Devendra Fadnavis