मुंबई : गेल्या महिन्याभरापासून जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यांचे सत्र सुरुच आहे. मंगळवारी जम्मू काश्मीरमध्ये दोडा येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. यामध्ये एका कॅप्टनसह चार जवान हुतात्मा झाले होते. या मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आक्रमक झाले असून त्यांनी अमित शाह हे अपयशी गृहमंत्री असल्याचा टोला लगावला. जम्मू-कश्मीरमध्ये होणाऱ्या हल्ल्यांमध्ये अनेक जवान हुतात्मा झालेत याला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हेच जबाबदार आहेत. नैतिकता शिल्लक असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शाह यांचा राजीनामा घ्यावा, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
तीच विटी आणि तोच दांडू : संजय राऊत म्हणाले, "नरेंद्र मोदी यांनी ज्या दिवशी पंतप्रधानपदाची शपथ घेतली नेमका त्याच दिवशी काश्मीरमध्ये सगळ्यात मोठा हल्ला झाला. इथेही तीच विटी आणि तोच दांडू. तेच गृहमंत्री जे पाच वर्ष अपयशी ठरले. तर दुसरीकडे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या बाबतीत सुद्धा तेच आहे. ज्यांच्याकडून पण काहीच ठोस कार्य झालं नाही. तेच अमित शाह, तेच राजनाथ सिंह, अतिरेक्यांनी जम्मू काश्मीरमध्ये धुमाकूळ घातला आहे. अमित शाह देशाचे गृहमंत्री म्हणून हात चोळत बसलेले आहेत. अमित शाह देशाच्या निवडणुका, इतर उद्योग, रोखे जमवणं, इतरांना धमक्या देणं याच्यात व्यग्र आहेत." असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.