मुंबई Sanjay Raut Attack On Pm Modi :महाराष्ट्र राज्य एका भटकत्या आत्म्याचं शिकार झालं आहे, अशी जहरी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी पुण्यातील प्रचार सभेत शरद पवार यांचं नाव न घेता केली. भटकत्या आत्म्याच्या या मुद्द्यावरून आता राजकारण तापलं असून उबाठा गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अतृप्त आत्मा वारंवार महाराष्ट्रात का भटकत आहे ? असा सवाल संजय राऊतांनी केला. हा आत्मा पंतप्रधानपदी बसला तर देशात भुताटकी येईल, असं रोखठोक उत्तर संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलं. संजय राऊत हे मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
अशा भुताटकीच्या आत्म्यांना महाराष्ट्र जुमानत नाही :संजय राऊत म्हणाले की, "महाराष्ट्राचे जे शत्रू आहेत. मग औरंगजेबाचा आत्मा असेल, अफजलखानाचा आत्मा असेल, हे 450 वर्षापासून भटकत आहेत. जे महाराष्ट्राचे शत्रू आहेत, मराठी माणसांचे शत्रू आहेत. ज्यांनी महाराष्ट्राला गाडलं आहे, अशा सर्वांचे आत्मे गेल्या 450 वर्षांपासून भटकत आहेत. त्यात आता हा नवीन गुजरातचा आत्मा आला आहे. मात्र अशा भुताटकीच्या आत्म्यांना महाराष्ट्र जुमानत नाही. महाराष्ट्र अंधश्रद्धा, फेकाफेकी याला कधीही महत्त्व देत नाही. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. हा पवित्र आत्म्यांचा प्रदेश आहे. उद्या 1 मे आहे, यासाठी 105 आत्म्यांनी महाराष्ट्रासाठी बलिदान दिलं, ते उद्या पंतप्रधान मोदींना शाप देणार आहेत. कारण मोदींनी जेवढे महाराष्ट्राचं आणि मराठी माणसाचं नुकसान केलं आहे. तेवढं आतापर्यंत कोणी केलं नसेल. यासाठी या अतृप्त आत्म्यांविरुद्ध ही महाराष्ट्राची लढाई आहे. उद्या एक मे महाराष्ट्र दिन आहे. या दिवशी आम्ही या 105 हुतात्म्यांना आदरांजली वाहणार आहोत. त्यांना सांगू महाराष्ट्र विरोधी जे आत्मे भटकत आहेत, आम्ही त्यांचा बदला घेऊ."
भाजपाला संविधान बदलायचं आहे :संजय राऊत पुढं म्हणाले की, "सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात होते, परंतु त्यांनी साधा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेखही केला नाही. कारण त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलायचं आहे. त्यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर राग आहे. म्हणून त्यांचं आत्मे महाराष्ट्रात भटकत आहेत. त्यांना संविधान बदलायचं आहे आणि शिवसेना या विरोधात ठामपणे उभी आहे."