मुंबई :उबाठा खादसदार संजय राऊत यांनी गडचिरोली नक्षलवाद प्रकरणावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं. मात्र त्यांनी यावेळी माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. गडचिरोलीत या आधीच्या पालकमंत्र्यांचं काम आम्ही पाहिलं आहे. या जिल्ह्यातून एजंट नेमून खंडण्या गोळा करण्याचं काम काही लोकांनी केलं. यापूर्वी देखील इथं खंडण्या आणि हप्ते गोळा करण्याचं काम झालं. त्यातून नक्षलवाद, गरीबी वाढली, अशी खरपूस टीका संजय राऊत यांनी नाव न घेता एकनाथ शिंदे यांच्यावर केली. त्यामुळे एकाच वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करणाऱ्या संजय राऊतांनी दुसरीकडं एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. त्यामुळे उबाठा पक्षात नेमकं काय सुरू आहे. याबाबत मोठ्या उलटसुलट चर्चा सुरू आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कौतुकाचा वर्षाव :नक्षलवाद हा गरीबी आणि बेरोजगारीतून निर्माण झालेला राक्षस आहे. नक्षलवाद नष्ट होणार असेल आणि मुख्यमंत्र्यांनी पाऊल उचललं असेल, तर ते विधायक काम आहे. त्यांचं अभिनंदन आणि कौतुक करणं आपल्या सर्वांचं काम आहे. या अगोदरही पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा चांगली कामं केली तेव्हा त्यांचं कौतुक केलं. चांगल्या कामाचं कौतुक करण्याची आमच्या पक्षाची आणि शिवसेना प्रमुखांची भूमिका राहिली आहे. जमशेदपूरनंतर जर गडचिरोली ही पोलाद सिटी म्हणून विकसित करण्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर जहाल नक्षलवाद्यांनी शस्र खाली ठेवलं आणि आत्मसमर्पण केलं. त्यामुळे नक्षलवाद सोडून तरुण जर संविधान हाती घेत असतील तर ते कौतुकास्पद आहे, असंही खासदार संजय राऊत यांनी यावेळी स्पष्ट केलं.