नागपूर : विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Election 2024) भारतीय जनता पार्टीने अभूतपूर्व यश मिळवून 132 जागांवर विजय मिळवला. लोकसभेला आलेलं अपयश आणि विधानसभेतील भरारी यामध्ये अनेक मायक्रो प्लॅनिंगचा जय झालाय. बूथ टू बूथ मार्केटिंग करत भाजपानं लोकसभेतील पराभव विधानसभेत कसा मोडून काढला, यासंदर्भात भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडे यांनी 'ईटीव्ही भारत'शी संवाद साधला. तसंच भाजपानं 132 जागांपैकी तब्बल 75 जागा या केवळ बूथ मॅनेजमेंटच्या जोरावर जिंकल्याचंही त्यांनी स्पष्ट सांगितलंय.
भाजपाच्या बूथचे वर्गीकरण कसे असते समजून घ्या :
A कॅटेगरी म्हणजे लोकसभा निवडणुकीत जिथं महायुतीला 50% पेक्षा जास्त मतदान मिळाले.
B कॅटेगरी म्हणजे जिथे महायुतीला 35 ते 50% मतदान मिळाले.
C कॅटेगरी म्हणजे जिथे महायुतीला 20 ते 35% मतदान मिळाले.
D कॅटेगरी म्हणजे जिथे महायुतीला 20% पेक्षा कमी मतदान मिळाले.
सी आणि बी कॅटेगरीच्या बूथवर लक्ष केंद्रित : लोकसभेच्या निकालानंतर भाजपानं सी आणि बी कॅटेगिरीच्या बूथवर सर्वाधिक लक्ष केंद्रित केलं होतं. त्यानुसार भाजपानं मायक्रो प्लॅनिंग केलं. भाजपाने सर्वात अगोदर नवीन मतदार नोंदणी करून लोकसभेत दुसऱ्या पक्षाला मतदान करणाऱ्या मतदारांना भाजपा किंवा महायुतीसाठी मतदान करण्यास प्रोत्साहित केलं. तसंच सी कॅटेगरीचे दहा टक्के बूथ बी कॅटेगरीमध्ये नेले. तर बी कॅटेगरीचे सुमारे 20% बूथ ए कॅटेगरीत परावर्तित केले.