छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) - जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं मागील वर्षीच्या तुलनेने अधिक मतदान झाले (Assembly election 2024). 2019 विधानसभा निवडणुकीत जवळपास 66% टक्के मतदान झालं असताना यावर्षी 68.89% टक्के मतदान झालं. जिल्हाधिकाऱ्यांनी काल दिलेली ही आकडेवारी आहे. अंतिमतः यात किरकोळ बदल होऊ शकतो. यामध्ये सिल्लोड मतदार संघात विक्रमी असे 80% टक्के मतदान झालं. तर सर्वात कमी 59.35% मतदान औरंगाबाद मध्य मतदार संघात झालं. दिवसभरात काही मतदार संघात राजकीय पक्षांमध्ये वादविवाद तर काही ठिकाणी मारामारी देखील झल्याच्या घटना घडल्या. तर वैजापूर मतदार संघात शिंदे गटाचे उमेदवार रमेश बोरनारे यांच्या वाहनावर अज्ञात इसमांनी दगडफेक केली आहे.
संजय शिरसाट संतप्त -औरंगाबाद पश्चिम मतदार संघाचे शिंदे शिवसेनेचे उमेदवार संजय शिरसाट आणि ठाकरे गटाचा कार्यकर्ता यांच्यात वाद झाला. मतदान प्रक्रिया पार पडत असताना शिरसाट जात असताना ठाकरेंच्या कार्यकर्त्याने हातात ठाकरे पक्षाचा ध्वज घेत जोरदार घोषणबाजी केली. त्यावेळी शिरसाट यांनी आपला ताफा थांबवत त्या कार्यकर्त्याला धमकी देत दम भरला. त्यांनतर विरोधीपक्ष नेते अंबदास दानवे यांनी सदरील व्हिडिओ समाज माध्यमांवर टाकून घटनेचा निषेध व्यक्त केला. यावर निवडणूक आयोगाचं लक्ष नाही का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर शिरसाट यांनी सदरील कार्यकर्ता करत असलेल्या कृतीने मतदारांना अडचण होत असल्यानं राग आला असं त्यांनी सांगितलं.