छत्रपती संभाजीनगर Sambhaji Brigade Aggressive : अयोध्येत प्रभू श्री रामाच्या मंदिराची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आल्यानंतर देशात सर्वत्र आनंदाचं वातावरण आहे. मात्र या सोहळ्यातील गोविंद गिरी महाराजांच्या वक्तव्यामुळं राज्यात मात्र संतापाची लाट निर्माण होताना दिसून येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी संन्यास घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावेळी त्यांच्या गुरूंनी त्यांची समजूत काढली होती, असं वक्तव्य त्यांनी केलं. तर समर्थ रामदास, महाराजांचे गुरू असल्याचं आणि पंतप्रधान मोदींची तुलना महाराजांसोबत त्यांनी केल्यानं काही संघटना आक्रमक झाल्या आहेत. गोविंद गिरी महाराजांनी महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी केली आहे.
गोविंद गिरी महाराजांनी केलं वक्तव्य :सोमवारी अयोध्येमध्ये प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या या कार्यक्रमात गोविंद गिरी महाराज यांनी केलेल्या वक्तव्यानं नव्या वादाला तोंड फोडलं आहे. "छत्रपती शिवाजी महाराज मल्लिकार्जुनच्या दर्शनासाठी श्री शैलमला गेले. तीन दिवस उपवास केला. तीन दिवस तेथेच राहिले. म्हणाले की, मी संन्यास घेणार, आता मला परत घेऊन जाऊ नका. आता मला राज्य करायचं नाही. मग त्यांना गुरूंनी आणि ज्येष्ठ मंत्र्यांनी समजावलं आणि परत आणलं" असं विधान त्यांनी केलं आहे. मात्र अशा पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांनी कुठंही म्हटलेलं नाही. तसा कुठलाही ऐतिहासिक प्रसंग नाही. तसा कुठल्याही प्रकारचा ऐतिहासिक पुरावा नाही. त्यामुळं हा खोटारडेपणा गोविंद गिरी यांनी केल्याचा आरोप संभाजी ब्रिगेड संघटनेनं केला आहे.
महाराजांची तुलना मोदींशी कशी :गोविंद गिरी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना ही नरेंद्र मोदींशी केलेली आहे. "ज्या श्रीरामानं आपल्या प्रिय पत्नीला परत आणण्यासाठी रावणाशी महायुद्ध केलं आणि आपल्या पत्नीला सन्मानानं परत आणलं. तिथे आज मोदी पत्नीला सोडून श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेला जातात. अशा पंतप्रधान मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी गोविंद गिरी करतात. शिवाजी महाराजांची तुलना मोदीच काय तर जगात कुणाशीही होऊ शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू रामदास नव्हते. हे वारंवार इतिहासानं सिद्ध केलेलं आहे. तज्ञ इतिहासकारांच्या समितीनं सुद्धा सिद्ध केलं आहे. त्यामध्ये बाबासाहेब पुरंदरे सुद्धा होते. तरीसुद्धा वारंवार अशा पद्धतीनं विकृत इतिहास सांगण्याचं काम आणि छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करण्याचं काम आरएसएस करत असते" असा आरोप संभाजी ब्रिगेडनं तर्फे केला. गोविंद गिरी यांचा संभाजी ब्रिगेडच्या वतीनं जाहीर निषेध केला जात आहे. "गोविंद गिरी यांनी जाहीर माफी मागावी. इतकंच नाही तर महाराष्ट्रातील आरएसएसच्या तज्ञ इतिहासकारांनी गोविंदगिरींना खरा इतिहास समजून सांगावा" अशी मागणी संभाजी ब्रिगेड प्रदेश प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी केली आहे.