मुंबईSalman Khan House Firing: १४ एप्रिलला पहाटे ४.५० वाजताच्या सुमारास अभिनेता सलमान खानच्या (Actor Salman Khan) वांद्रे येथील घरावर पाच वेळा गोळ्या झाडून गोळीबार केला. याप्रकरणी गुजरात राज्यातील भूजमधील मंदिरातून सागर पाल आणि विक्की गुप्ता या दोघांना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं अटक केली होती. मात्र, आरोपींनी दोन पिस्तुलं आणि जिवंत काडतूस सुरतमधील तापी नदीत (Tapi River) फेकून दिल्याचं चौकशीत निष्पन्न झालंय. त्यानंतर आज मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकानं खाजगी कंपनीच्या मदतीनं तापी नदीत आज शोध मोहीम सुरु केली, अशी माहिती गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्त लखमी गौतम यांनी दिली.
तापी नदीत सापडले पिस्तुल आणि जिवंत काडतूस: आज सायंकाळी सलमान खान गोळीबार प्रकरणात वापरलेले पिस्तुल आणि जिवंत काडतूस सुरतमधील तापी नदीत गुन्हे शाखेच्या पथकाला सापडली आहे. सलमान खान गोळीबार प्रकरणात पनवेल येथील आरोपींच्या घरी दोन पिस्तुले आणून देण्यात आली होती. नंतर दोनपैकी एक पिस्तूल सागर पाल आणि विक्की गुप्ता हे दोघे एक पिस्तूल घेऊन बिहारला होळी दरम्यान गेले होते. तेथे या पिस्तुलीच्या मदतीनं फायरिंगचा सराव करण्यात आला होता.