मुंबई Salman Khan House Firing : बॉलिवूडचा अभिनेता सलमान खान गोळीबार प्रकरणात कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि भाऊ अनमोल बिश्नोई या दोघांना वॉन्टेड आरोपी घोषित करण्यात आलंय. तसंच सलमान खान गोळीबार प्रकरणात एफआयआरमध्ये ५०६ (२), ११५ आणि २०१ ही कलम वाढवण्यात आली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी दिली.
तीन नवीन कलमांचा समावेश : अभिनेता सलमान खान गोळीबार प्रकरणी मुंबई पोलिसांनी एफआयआरमध्ये आणखी तीन नवीन कलमांचा समावेश केलाय. मुंबई गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यानं सांगितलं की, "मुंबई पोलिसांनी या एफआयआरमध्ये ५०६ (२), ११५ आणि २०१ ही कलमं जोडली आहेत." मुंबई गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यानं असंही सांगितलं की, "मुंबई पोलिसांनी लॉरेन्स बिश्नोई आणि त्याचा भाऊ अनमोल बिश्नोई यांना वॉन्टेड आरोपी म्हणून घोषित केलंय." याआधी वांद्रे पोलीस यांनी भारतीय दंड संविधान कलम 307, 34, 120 ब आणि भारतीय हत्यार अधिनियम कलम 25 आणि 3 अन्वये गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर हा गुन्हा मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडं वर्ग करण्यात आलाय.