महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मनमाड गुरुद्वारात सालाना जोडमेला मोठ्या उत्साहात संपन्न, चित्तथरारक प्रात्यक्षिक सादर - SALANA JOD MELA 2024

मनमाड शहरातील गुरुद्वारात गुरु-दा-गद्दी सोहळा आणि सालाना जोडमेला पारंपरिक पद्धतीनं मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गुरुद्वारात भजन, कीर्तनासह इतर धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं.

SALANA JOD MELA 2024
सालाना जोडमेला मोठ्या उत्साहात संपन्न (Source - ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 23, 2024, 7:27 AM IST

Updated : Dec 23, 2024, 10:54 AM IST

नाशिक : शीख धर्मीयांचं श्रद्धास्थान असलेल्या मनमाड शहरातील गुरुद्वारात रविवार (23 डिसेंबर) गुरु-दा-गद्दी सोहळा आणि सालाना जोडमेला पारंपरिक पद्धतीनं मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय. सालाना जोडमेलानिमित्त गुरुद्वारात अखंड पाठ समाप्ती, भजन, कीर्तन, लंगर आदीसह इतर धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. दुपारनंतर शहरातून भव्य शोभा कीर्तन यात्रा काढण्यात आली. यावेळी ढोल ताशा, पंजाबी बँड, पारंपरिक हलगी, डीजे यासह इतर वाद्य या मिरवणुकीत सहभागी झाले होते. त्यात तलवारबाजी यासह इतर पारंपरिक शस्त्रांची चित्तथरारक प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली. या सोहळ्यासाठी पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, मुंबई मध्य प्रदेश यासह देशभरातून मोठ्या संख्येनं भाविक आले होते.

भव्य शोभा यात्रा काढण्यात आली : देशातील अमृतसर आणि नांदेडनंतर मनमाडचा गुरुद्वारा मानला जातो. येथे दरवर्षी डिसेंबर महिन्यात गुरु-दा-गद्दी सोहळा आणि सालाना जोडमेला साजरा करण्याची गेल्या अनेक वर्षांची परंपरा आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही हा सोहळा मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आलाय. गुरुद्वारा प्रबंधक बाबा रणजितसिंग कारसेवावाले यांच्या नेतृत्वाखाली भव्य शोभा यात्रा काढण्यात आली होती. यावेळी शीख बांधवांनी तलवारबाजीसह इतर चित्तथरारक प्रात्यक्षिकं दाखविली. गुरुद्वारा येथून काढण्यात आलेल्या शोभा यात्रेचं ठिकठिकाणी स्वागत करून धर्मगुरूंचा सत्कार करण्यात आला.

अमृतसर, नांदेड त्यानंतर मनमाडच्या गुरुद्वाराचा नंबर लागतो. भारतातील प्रमुख गुरुद्वारांमध्ये मनमाड गुरुद्वाराचा समावेश आहे. येथील धार्मिक कार्यक्रमास संपूर्ण भारतातून शीख बांधव येतात. सालाना जोडमेलानिमित्त शीख बांधव मोठ्या संख्येनं जमले होते. मोठ्या थाटामाटात सालाना जोडमेला संपन्न झाला. सालाना जोडमेलाच्या आधी महिनाभर सुरू असलेल्या भजन आणि कीर्तनाच्या अखंड पठणाची रविवारी सकाळी समाप्ती करण्यात आली. गुरुद्वारामध्ये श्री गुरुगोविंद सिंग यांचं भव्यदिव्य पोस्टर लावण्यात आलं होतं. यावेळी लंगरचेदेखील वाटप करण्यात आले. एकात्मता चौकात वंदे मातरम गणेश मंडळाचे संस्थापक संजय कटारिया आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी या भव्य रॅलीचं स्वागत केलं. यावेळी बाबा रणजित सिंह यांचा आणि त्यांच्यासोबत आलेल्या मान्यवरांचा कटारिया यांच्या हस्ते सत्कार करण्यात आलाय.

मुस्लिम समाजाच्या वतीनं बाबा रणजित सिंह यांचा सत्कार : भारत हा सर्वधर्म समभाव जोपासणारा देश आहे. या देशातील एकात्मता ही जगात प्रसिद्ध आहे. मनमाड शहरात देखील सर्वधर्म समभाव एकोपा आहे, हे सालाना जोडमेलाच्या निमित्तानं देखील पाहायला मिळालं. रॅली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ येताच फुले-शाहू-आंबेडकर मुस्लिम विचारमंचातर्फे आणि मुस्लिम समाजाच्या वतीनं बाबा रणजित सिंह यांचा फिरोज शेख, इस्माईल पठाण, जावेद शेख, सद्दाम अत्तार, कदिर शेख, फारूक कुरेशी सनी अरोरा, नगरसेवक आमिन पटेल, मतीन अत्तार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यानिमित्तानं सर्वधर्मसमभाव हा एकतेचा संदेश देण्यात आलाय.

हेही वाचा

  1. "भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान दिलं नाही, तर महायुतीविरोधात...", ओबीसी नेत्यांचा सरकारला इशारा
  2. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक ॲक्शन मोडवर; एसटी प्रशासनाला दिला महिन्याभराचा अल्टीमेटम
  3. धक्कादायक! रात्री शेतात गाढ झोपेत असताना अज्ञातांनी शेतकऱ्याचा कापला गळा
Last Updated : Dec 23, 2024, 10:54 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details