मुंबई : बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानच्या निवासस्थानात घुसून त्याच्यावर हल्ला करणाऱ्या मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद याला पकडण्यात मुंबई पोलिसांना यश आलं. मात्र मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद यानं बांगलादेशातून भारतात येण्यासाठी डावकी नदीत तब्बल 200 मीटर पोहून घुसखोरी केली. घुसखोरी केल्यानंतर त्यानं कोलकातामधील एका हॉटेलमध्ये वेटरचं काम करत कागदपत्रं मिळवली. त्यानंतर विजय दास या नावानं त्यानं ठाण्यातील लेबर कॅम्प गाठला. मुंबई पोलिसांनी पकडल्यानंतर आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद यानं भारतात कसा प्रवेश केला, इथपासून त्यानं कागदपत्रं कशी काढली, याबाबतची धक्कादायक माहिती पोलिसांना दिली.
डावकी नदीत 200 मीटर पोहून केली भारतात घुसखोरी :मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद यानं अभिनेता सैफ अली खान याच्यावर हल्ला केल्यानं देशभरात खळबळ उडाली. मुंबई पोलिसांनी सैफ अली खान हल्ला प्रकरणात मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद याला अटक केली. त्याची कसून चौकशी केली असता, मुंबई पोलिसांकडं त्यानं अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. बांगलादेशातून भारतात घुसखोरी करण्यासाठी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद यानं बांगलादेश मेघालय सीमेवरुन घुसखोरी केली. मात्र ही घुसखोरी करताना त्यानं डावकी नदीत 200 मीटर पोहून तो भारतात घुसला.
कोलकाता इथं स्थानिकाच्या नावावर घेतलं सीमकार्ड :मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद यानं भारतात घुसखोरी केल्यानंतर त्यानं कोलकाता इथं एका हॉटेलमध्ये काम मिळवलं. त्यानंतर त्यानं एका स्थानिकाच्या नावावर सीम कार्ड खरेदी केलं. त्या सीम कार्डचा वापर करुन त्यानं इतर सीम कार्ड खरेदी केली. याच सीमकार्डच्या माध्यमातून तो कुटुंबीयांच्या संपर्कात होता, अशी माहिती सूत्रांनी दिली. कोलकाता इथं त्यानं आपलं मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद हे नाव लपवून विजय दास या नावानं तो वावरत होता, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. मुंबईत आल्यावर त्यानं एका स्थानिक कंत्राटदाराच्या माध्यमातून मुंबईत आणि काही काळ ठाण्यात काम केलं.