शिर्डी (अहिल्यानगर)- जगभरात साईबाबांचे कोट्यवधी साईभक्त आहेत. हे साईभक्त पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त सदगुरुंचा आशिर्वाद घेण्याकरिता शिर्डीला येतात. साईबाबांच्या शिर्डीतील दसरा उत्सवाला आज भक्तीमय वातावरणात सुरुवात झालीय. पहाटच्या काकड आरतीनंतर साईंच्या मूर्तिला मंगलस्नान घालण्यात आले. साईप्रतिमा, वीणा आणि साईचरित्राची साईसमाधी मंदिर ते द्वारकामाईपर्यंत सवाद्य मिरवणुक काढण्यात आली. त्यानंतर द्वारकामाई मंदिरात अखंड पारायणाचं पठण करण्यात आले.
तीन दिवसीय पुण्यतिथी उत्सवालाआजपासून सुरुवात झाली. मिरवणुक पुन्हा साईमंदिरात आल्यानंतर बाबांना मंगलस्नान घालण्यात आलं. साईंच्या मूर्तिला आज सोन्याच्या अलंकारानं सजवण्यात आलय. उत्सवात भाविक मोठया प्रमाणात सामील झाले आहेत. मुंबई येथील द्वारकामाई मित्र मंडळानं स्वखर्चानं ४ क्रमांक प्रवेशद्वारा समोर साई बालाजी देखावा उभारण्यात आला आहे. यात भगवान विष्णुचे विविध अवतार दाखवण्याऱ्या मूर्ति स्थापित करण्यात आल्या आहेत. हा देखावा भाविकांच लक्ष वेधून घेत आहे. साई मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाईने नटवण्यात आलंय. उद्या उत्सवाचा मुख्य दिवस असल्यानं लाखो भाविंकांची मांदियाळी शिर्डीत पहावयास मिळणार आहे.
साईबाबा पुण्यतिथी महोत्सव (Source- ETV Bharat Reporter)
साईबाबांनी १५ ऑक्टोबर १९१८ रोजी आपला मानवी देह ठेवला. तेव्हापासुन शिर्डीत साईभक्त दसरा उत्सव साजरा करतात. यावर्षीचा हा १०६ वा पुण्यतिथी उत्सव आहे. आज सकाळपासून मंगलमय वातावरणात उत्सवाला सुरुवात झालीय. शिर्डी मंदिरात अखंड पारायणाला सुरुवात झाली. उत्सवाचा हा पहिला दिवस असल्यामुळे अखंड पारायणासाठी द्वारकामाई मंदिर रात्रभर खुले राहणार आहे.
पुण्यतिथी महोत्सवाच्या पहिल्या दिवशीचे कार्यक्रम आणि पूजा
- पहाटे ५.१५ वाजता श्रींची काकड आरती
- पहाटे ५.४५ वाजता श्रींच्या फोटोची आणि पोथीची मिरवणुक
- पहाटे ६ वाजता द्वा कामाईत श्री साईसच्चरिताचे अखंड पारायणास सुरुवात
- पहाटे ६.२० वाजता श्रींचे मंगलस्नान
- सकाळी ७ वाजता श्रींची पाद्यपुजा
- सकाळी १० ते १२ यावेळेत श्री शंकर गिरी अंबड, जालना यांचा ‘साईभजन’ कार्यक्रम
- दुपारी १२.३० वाजता माध्यान्ह आरती
- दुपारी १ ते ३ यावेळेत अश्विनी सरदेशमुख, मुंबई यांचा ‘साईगीतांजली’ कार्यक्रम
- दुपारी ४ वाजता ह.भ.प. श्री प्रणव जोशी , जालना यांचा कीर्तनाचा कार्यक्रम
- सायंकाळी ६.१५ वाजता धुपारती होईल.
- रात्री ७.०० ते ९.३० यावेळेत साईद्वारकामाई, बोरीवली, मुंबई यांचा ‘साईराम संगीत संध्या’ कार्यक्रम
- रात्री ९.१५ वाजता गावातून पालखीची मिरवणूक होणार
- रात्री १०.०० वाजता श्रींची शेजारती (पालखी मिरवणुक परत आल्यानंतर)
मिरवणुकीत प्रशासकीय अधिकारी, पुजारी, ग्रामस्थांसह साईभक्त सहभागी-साईबाबा पुण्यतिथी उत्सवानिमित्त प्रथम दिवशी श्रींची प्रतिमा, पोथी आणि वीणाची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी तथा संस्थानचे तदर्थ समिती सदस्य सिद्धाराम सालीमठ यांनी पोथी, मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी वीणा घेऊन सहभाग घेतला. तर कृषी अधिकारी अनिल भणगे व मुख्याध्यापक कन्या विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय गंगाधर वरघुडे यांनी प्रतिमा घेवून सहभाग घेतला. यावेळी संस्थानचे प्र. उप मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासकिय अधिकारी संदीपकुमार भोसले, प्रशासकिय अधिकारी प्रज्ञा महांडुळे – सिनारे, मंदिर प्रमुख विष्णु थोरात, मंदिर पुजारी, शिर्डी ग्रामस्थ आणि साईभक्त मोठ्या संख्येनं उपस्थित झाले.
हेही वाचा-
- साई नगरी सजली; साईबाबांच्या 3 दिवसीय पुण्यतिथी उत्सवाची साई संस्थानकडून जय्यत तयारी
- साईचरणी तब्बल 1 कोटी रुपयांची सुवर्ण पंचारती अर्पण; पाहा व्हिडिओ - Gold Pancharati