मुंबई-माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानं राज्यात राजकीय वातावरण तापलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्यावर पहिली प्रतिक्रिया दिली.
उपमुख्यमंत्री तथा शरद पवार यांचे पुतणे अजित पवार म्हणाले, "विरोधकांवर बोलताना पातळी सोडून बोलू नये. आरोप करण्याची पद्धत असते. सदाभाऊंच्या वक्तव्याचा निषेध करत आहोत. त्यांच वक्तव्य अत्यंत निषेधार्ह आहे. खोत यांचे वक्तव्य म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी आहे. वक्तव्य चुकीचं असल्याचं खोत यांना फोनवरून सांगितलं आहे."
खपवून घेणार नाही-अजित पवार-अजित पवार यांनी एक्स मीडियावर पोस्ट करूनही नाराजी व्यक्त केली. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले," ज्येष्ठ नेते आदरणीय पवार साहेब यांच्या विषयी सदाभाऊ खोत यांनी केलेले वक्तव्य हे अत्यंत चुकीचं आणि निंदनीय आहे. अशा पद्धतीनं खालच्या पातळीवर पवार साहेबांवर वैयक्तिक टीका करणं आम्हाला पूर्णपणे अमान्य आहे. ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आणि वैयक्तिकरित्या मी या विधानाचा तीव्र शब्दात निषेध करत आहे." यापुढे पवार साहेबांवर खालच्या पातळीवर जाऊन कोणी वैयक्तिक टीका केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खपवून घेणार नाही, अशा इशारादेखील उपमुख्यमंत्र्यांनी दिला.
आधी टीका, मग मागितली माफी (Source- ETV Bharat) - राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी सदाभाऊ खोत यांच्या भाषणाचा व्हिडिओ एक्स मीडियावर पोस्ट करत इशारा दिला. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले, " बोलणार आणि हसणारे दोघेही लक्षात ठेवत आहोत. कॅन्सरसारख्या जीवघेण्या संकटावर मात करुन पवार साहेबांनी अनेक कॅन्सरग्रस्तांना प्रेरणा दिली."
राऊतांची टीकाशिवसेनेचे खासदार (उद्धव ठाकरे) संजय राऊत यांनी खोत यांच्या विधानावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. राऊत यांनी म्हटले, "खोत यांना आधी स्वत:चा चेहरा पाहावा. शरद पवार हे सर्वोच्च नेते आहेत. फडवणीस आणि त्यांची टोळी महाराष्ट्र संपवायला लागला आहे. कानाखाली लावण्याऐवजी फडणवीस हे फिदीफिदी हसत होते. आजारपणावर बोलून महाराष्ट्राची मान शरमेनं खाली गेली. कुणाच्या आजारपणावर बोलण अयोग्य आहे."
खोत यांनी मागितली माफी-चौफेर टीका होत असताना सदाभाऊ खोत यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, " माझा कुणाकडे पाहून बोलण्याचा हेतू नव्हता. ही गावगाड्याची भाषा होती. कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो. गावगाड्याची भाषा समजण्यासाठी मातीत रुजावे लागते. राबावे लागते. मरावे लागते, तेव्हाच भाषा समजते."
काय म्हणाले होते सदाभाऊ खोत? जत येथील सभेत सदाभाऊ खोत म्हणाले, "शरद पवारांना नवव्या महिन्यात कळा लागल्या आहेत. त्यांना चिल्यापिल्यांचे काय होईल, अशी चिंता वाटली आहे. त्यांच्या चिल्यापिल्यांनी कारखाने, बँका आणि सुतगिरणी मिळविल्या आहेत. तरीही भाषणात महाराष्ट्र बदलायचा आहे, चेहरा बदलायचा आहे, असे म्हणतात. तुमच्या चेहऱ्याप्रमाणं महाराष्ट्राचा चेहरा बदलयाचा का. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचा चेहरा बदलण्याचं काम केलं आहे."
- सदाभाऊ खोत यांचा पूर्वनियोजित पुणे दौरा ढकलला आहे. पुण्यात आज भाजपाच्या वतीनं सदाभाऊ खोत यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. पत्रकार परिषद उधळून लावू, असा इशारा राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षानं दिला होता. असे असताना आज होणारी पत्रकार परिषद भाजपकडून रद्द करण्यात आली आहे.
हेही वाचा-
- घड्याळ चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयानं अजित पवारांना 'हे' दिले निर्देश
- उबाठाच्या तीन प्राथमिकता नोकरी . . नोकरी अन् नोकरी; धारावीत उभारणार वित्तीय केंद्र, उद्धव ठाकरेंनी जाहीर केला वचननामा