मुंबई Rohit Pawar ED Investigation :राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार चौकशीसाठी ईडी कार्यालयात पोहोचले आहेत. त्यांनी त्यापूर्वी मीडियाशी बोलताना "आपण ईडीला सर्व प्रकारे सहकार्य करणार असल्याचं सांगितलं. विधान भवन इथं जाऊन रोहित पवार हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापुढं नतमस्तक झाले. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात भेट घेऊन त्यांचा आशीर्वाद घेतला. यावेळी कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांच्या सोबत ईडी कार्यालयाकडं रोहित पवार रवाना झाले असून त्यांची ईडी चौकशी सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सुप्रिया सुळेंनी दिली संविधानाची प्रत भेट :बारामती अॅग्रो संदर्भात ईडीकडून रोहित पवार यांना बुधवारी हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आलं होतं. सकाळी साडे दहाच्या सुमारास रोहित पवार ईडी कार्यालयात दाखल झाले. यावेळी त्यांच्यासोबत खासदार सुप्रिया सुळे होत्या. सुप्रिया सुळे यांनी रोहित पवार यांना संविधानाची प्रत भेट दिली. त्यानंतर रोहित पवार यांनी सुप्रिया सुळे यांचं दर्शन घेऊन ईडी कार्यलयात प्रवेश केला.
चौकशीला सहकार्य करणार - रोहित पवार :"अधिकारी अधिकाऱ्यांचं काम करत असतात. यापूर्वी माहिती दिली होती, परत त्यांच्या प्रश्नाना उत्तर देणार आहे. अधिकारी दबावाखाली काम करत आहेत. त्यांच्या मागं कोणती सत्ता आहे, माहिती नाही. बलाढ्य शक्तीच्या विरोधात आम्ही सामान्य जनतेचा आवाज युवा संघर्षाच्या माध्यमातून आवाज उठवला होता. याचमुळं ही कारवाई झाल्याचं लोकांचं मत आहे. ईडीनं याबाबतची माहिती आम्ही सीबीआय आणि ईओडब्लूला दिली आहे. परत तीच माहिती मागवली आहे, ती माहिती घेऊन आज मी ईडी कार्यालयात आलो आहे."
मानसिक तयारी केली आहे :रोहित पवार यांना आज ईडीच्या अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी बोलावलं आहे. याबाबत त्यांना विचारलं असता, त्यांनी "मानसिक तयारी केली असून ते जे बोलतात, तसं करावं लागेल. चूक केलं नसेल, तर घाबरायचं कारण नाही. चौकशीनंतर पुन्हा शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली कामाला लागेल."
हेही वाचा :
- ईडी कारवाई सुरू झाली म्हणजे निवडणुका आल्या; ईडी चौकशीवरुन रोहित पवार आक्रमक
- 'लढेंगे और जितेंगे'! रोहित पवारांची ईडी चौकशी प्रकरणी सुप्रिया सुळे आक्रमक
- रोहित पवार यांची ईडीकडून चौकशी, सुप्रिया सुळेंनी दिली प्रतिक्रिया