जयपूर Macron-Modi in Jaipur : देश-विदेशात वैभवशाली वारसा आणि पर्यटनासाठी ओळखले जाणारे गुलाबी शहर आज आंतरराष्ट्रीय मंचावर मैत्रीचा इतिहास रचणार आहे. खरं तर राष्ट्रीय पर्यटन दिनानिमित्त प्रजासत्ताक दिनी राष्ट्रीय पाहुणे म्हणून भारत दौऱ्यावर आलेले फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन जयपूरमधून जगाला वारसा संवर्धनाचा संदेश देणार आहेत. पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन हे जयपूरच्या एक दिवसीय दौऱ्यावर येत आहेत. सर्वप्रथम मॅक्रॉन हे जयपूरला पोहोचतील, त्यानंतर पंतप्रधान मोदी देखील येथे दाखल होतील. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी रात्री उशिरा मुख्यमंत्री कार्यालयात मोदी आणि मॅक्रॉन यांच्या प्रस्तावित राजस्थान दौऱ्याच्या तयारीबाबत आढावा बैठक घेतली.
मोदी-मॅक्रॉन जयपूरमध्ये रोड शो करणार : मोदी आणि मॅक्रॉन यांच्या जयपूर दौऱ्यादरम्यान रोड शोही होणार आहे. या रोड शोची सर्व तयारी पूर्ण झाली असून मुख्यमंत्री भजनलाल शर्मा आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष सीपी जोशी यांनी बुधवारी (24 जानेवारी) रात्री उशिरापर्यंत पक्ष आणि अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कार्यक्रमाच्या व्यवस्थेबाबत आवश्यक मार्गदर्शक सूचना दिल्या. सीएम भजनलाल आणि अध्यक्ष सीपी जोशी म्हणाले की, पीएम मोदींच्या या दौर्यामुळे सर्वसामान्यांना कोणतीही अडचण येणार नाही आणि वाहतूक सुरळीत राहील.
असा होईल दौरा : राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन हे दुपारी अडीच वाजता विशेष विमानानं जयपूर विमानतळावर पोहोचणार आहेत. तेथून ते स्टेट हँगर मार्गे जवाहर सर्कल, वर्ल्ड ट्रेड पार्क समोर, एज्युकेशन कॉम्प्लेक्स, जेडीए स्क्वेअर, रामनिवास बाग येथे येतील. यावेळी सुमारे 13 हजार शालेय विद्यार्थी आणि लोक त्यांचं स्वागत करतील. त्यानंतर ते 3:15 वाजता आमेर किल्ल्यावर पोहोचतील. तिथून ते हत्ती स्टॅंडपासून गोल्फ कार्टद्वारे राजवाड्याचा अर्धा रस्ता पार करतील. यानंतर मॅक्रॉन सुरजपोल गेटपर्यंत अर्ध्या रस्त्याने पायी चालतील. त्यानंतर सुरजपोल गेटवर मॅक्रॉन आणि शिष्टमंडळातील सदस्यांचे पारंपरिक राजस्थानी पगडी घालून स्वागत केलं जाईल. येथील कार्यक्रम आटोपून ते 5:15 वाजेच्या सुमारास जंतर-मंतरला रवाना होतील. तिथे ते पंतप्रधान मोदींची भेट घेतील.
यानंतर सायंकाळी सहा वाजता दोन्ही नेते रोड शोसाठी रवाना होतील. रोड शो नंतर हवा महलसमोर पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती मॅक्रॉन यांचा चहा पिण्याचा कार्यक्रम आहे. हवा महल येथून संध्याकाळी 6:35 वाजता निघून दोघेही 6:45 वाजता हॉटेल रामबाग पॅलेसमध्ये पोहोचतील. हॉटेल रामबाग पॅलेसमध्ये ते रात्रीचे जेवण करतील. यानंतर रात्री 8:50 ला ते जयपूर विमानतळावर पोहोचतील.