मुंबई: राज्यातील विविध जिल्ह्यांचे पालकमंत्री जाहीर झाल्यानंतर आता 26 जानेवारी या भारतीय प्रजासत्ताक दिनी (Republic Day) कुठल्या जिल्ह्यात कोणत्या मंत्र्यांच्या हस्ते ध्वजवंदन (Flag Hoisting) होईल याची यादी सरकारनं जाहीर केलीय. राज्यातील काही मंत्र्यांना दोन दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळं नेमक्या कोणत्या जिल्ह्यात कोणते मंत्री ध्वजवंदन करतील याबाबत उत्सुकता होती. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोलीचे पालकमंत्री आहेत. त्यामुळं ते नेमके कुठे ध्वजवंदन करतील याचीही अनिश्चितता आता दूर झाली आहे.
कोण कोठे ध्वजवंदन करणार? : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्कमध्ये ध्वजवंदनाचा मुख्य कार्यक्रम होईल. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहतील. त्यामुळं गडचिरोली येथील ध्वजवंदनाची जबाबदारी गडचिरोलीचे सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांना देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाणे जिल्ह्याचे आणि मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यामुळं ते त्यांचा गृह जिल्हा असलेल्या ठाणे येथे ध्वजवंदन करतील. तर मुंबई शहर जिल्ह्यातील ध्वजवंदन मुंबई उपनगर जिल्ह्याचे सहपालकमंत्री असलेले मंगल प्रभात लोढा करतील. मुंबई उपनगर जिल्ह्यात पालकमंत्री आशिष शेलार ध्वजारोहण करतील. उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे आणि बीड या दोन जिल्ह्यांचे पालकमंत्री आहेत. त्यामुळं ते प्रजासत्ताक दिनी त्यांच्या गृह जिल्हा असलेल्या पुणे येथे ध्वजवंदन करतील. तर बीड येथील ध्वजवंदनाची जबाबदारी राष्ट्रवादीचे मंत्री दत्तात्रय भरणे यांना देण्यात आले आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांना नागपूर आणि अमरावती जिल्ह्याचं पालकमंत्री बनवण्यात आलं आहे. ते नागपूर या त्यांच्या गृह जिल्ह्यात ध्वजवंदन करतील तर अमरावतीमध्ये इंद्रनील नाईक ध्वजवंदन करतील.
बीड आणि अमरावती कोण करणार ध्वजवंदन? : दत्ता भरणे आणि इंद्रनील नाईक यांना कोणत्याही जिल्ह्याचे पालकमंत्री बनवण्यात आलेले नाही. त्यामुळं त्यांना भरणे यांना बीड जिल्ह्यात ध्वजवंदन करण्याचा सन्मान देण्यात आला आहे, तर नाईक यांना अमरावती जिल्ह्यात ध्वजवंदन करण्याचा सन्मान देण्यात आला आहे.