अहिल्यानगर- नवी दिल्लीतील प्रजासत्ताक दिनाला हजर राहण्याची अनेकांना इच्छा असते. पण, जर राष्ट्रपती भवनातूनच खास निमंत्रण मिळाले तर... निश्चितच आनंद आणि सुखद धक्का बसेल. हा अनुभव अहिल्यानगरमधील शेतकरी रामचंद्र गणपत भोजणे घेत आहेत. त्यांना राष्ट्रपती भवनकडून प्रजासत्ताक दिनाला उपस्थित राहण्याचं निमंत्रण मिळालं आहे.
रामचंद्र गणपत भोजणे यांचं कुटुंब अनेक पिढ्यांपासून जंगलातून लाकडं आणून चुलीवर घरातील स्वयंपाक करत आलेलं आहे. त्यांना राष्ट्रीय बायोगॅस प्रकल्प योजनेची माहिती पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांकडून मिळाली. त्यानंतर भोजणे या शेतकऱ्यानं राष्ट्रीय बायोगॅस प्रकल्प योजना आपल्या शेतात राबवली. याच प्रकल्पामुळे भोजणे या शेतकऱ्याला राष्ट्रपती भवनमधील खास कार्यक्रमाला हजर राहता येणार आहे. त्यामुळे या शेतकऱ्याचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. हे शेतकरी अकोले तालुक्यातील कोतुळ येथील रहिवासी आहेत.
राष्ट्रपती भवनमध्ये काय आहे कार्यक्रम?राष्ट्रीय बायोगॅस प्रकल्प योजनेचा लाभ घेतलेल्या महाराष्ट्रातील दोन शेतकऱ्यांची राष्ट्रपती कार्यालयाकडून निवड करण्यात आली आहे. त्यापैकी नांदेड येथील शेतकरी आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील रामचंद्र भोजणे हे शेतकरी आहेत. भोजणे यांना प्रजासत्ताक दिनानिमित्त उपस्थित राहण्यासाठी राष्ट्रपती भवन कार्यालयानं विशेष निमंत्रण पाठविलं आहे. भारतातील विविध क्षेत्रातील नामांकित व्यक्ती आणि शासकीय योजनेचा लाभ घेतलेल्या व्यक्ती अशा जवळपास 250 व्यक्तींची राष्ट्रपती भवनमध्ये होणाऱ्या 'एट होम 2025' स्वागत समारंभ कार्यक्रमासाठी निवड केली आहे. या व्यक्तींना निमंत्रण पत्रिका पाठवून प्रजासत्ताक सोहळ्याला उपस्थित राहण्याची विनंती केली आहे.
डाक विभागाकडून सन्मानपूर्वक निमंत्रण पत्रिका-शासकीय लाभार्थी म्हणून निवड झालेले रामचंद्र भोजणे हे अहिल्यानगर जिल्ह्यातील एकमेव व्यक्ती आहेत. ही निमंत्रण पत्रिका शनिवारी संगमनेर डाक विभागाचे सहाय्यक डाक अधीक्षक संतोष जोशी, पोस्टमन वाकचौरे यांनी त्यांना सन्मानपूर्वक दिली. भारतातील सर्वोच्च कार्यालय राष्ट्रपती भवन यांच्याकडून झालेली निवड आणि विशेष निमंत्रण यामुळे भोजणे कुटुंबाला अतिशय आनंद झाला आहे. त्यांनी घराची अतिशय उत्तम सजावट केली आहे.
अशा पद्धतीनं उभारला बायोगॅस प्रकल्प-रामचंद्र भोजणे यांच्याकडे तीन एकर शेती आहे. त्यांनी अर्धा गुठा क्षेत्रात सात फूट रुंद आणि साडेसात फूट उंच खोल खड्डे घेतले. यात हा राष्ट्रीय बायोगॅस प्रकल्प 2023-2024 साली उभारला आहे. भोजणे एसटीमध्ये येत असल्यानं सरकारनं त्यांना हा प्रकल्प उभारण्यासाठी 27 हजार रुपयं अनुदान दिलं. तर भोजणे यांनी स्वतःकडील 8 हजार रुपय खर्च केले आहेत. एकूण 35 हजार रुपयांमध्ये हा प्रकल्प उभा राहिला. हा प्रकल्प उभा केल्यानंतर घरी एक गाय होती. हे प्रमाण वाढून त्यांच्याकडं सध्या 8 गाई आहेत. दिवसभरात 8 ते 10 किलो गाईंचे शेण प्रकल्पासाठी वापरण्यात येते. घरातील स्वयंपाक आणि अंघोळीसाठी लागणारे गरम पाणी याकरिता प्रकल्पाचा वापर होत आहे.