मुंबई Aanvi Kamdar Dies :रिल्ससाठी लोक काहीही करायला तयार असतात. मात्र, अनेकदा हे व्हिडिओ बनवणं आणि फोटो काढणं धोकादायकही ठरतं. इतकंच नाही तर यामुळं काहींना आपला जीवही गमवावा लागतो. मागील महिन्याभरात घडलेल्या दोन घटनेनंतर आता अशीच आणखी एक घटना माणगावमध्ये घडलीय.माणगाव तालुक्यातील कुंभे येथे पर्यटनासाठी आलेल्या मुंबईतील तरुणीचा इन्स्टाग्रामसाठी रिल करताना दरीत पडून मृत्यू झाला. अन्वी कामदार असं या तरुणीचं नाव असून ती व्यवसायानं चार्टर्ड अकाऊंटंट होती. तर सोशल मीडियावर इन्फ्ल्यूएन्सर म्हणून ती नावारूपास आली होती.
नेमकं काय घडलं? : मिळालेल्या माहितीनुसार, अन्वी कामदार आपल्या सात सहकाऱ्यांसह वर्षासहलीसाठी माणगावमधील कुंभे इथं आली होती. एका कड्यावर इन्स्टाग्रामसाठी रील बनवत असताना तोल जाऊन ती 300 फूट दरीत कोसळली. तिच्या सहकाऱ्यांनी यासंदर्भातील माहिती माणगाव पोलीस ठाण्यात कळवली. माणगांवचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी स्थानिक बचाव पथकांना पाचारण केलं. दोरीच्या साहाय्यानं बचाव पथकं दरीत उतरली. यावेळी अन्वी गंभीर जखमी अवस्थेत असल्याचं आढळलं. तिला तात्काळ स्ट्रेचरच्या साहाय्यानं दोरीनं ओढून वर काढण्यात आलं. मात्र, माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यापूर्वी तिचा मृत्यू झाला होता.