महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विधानसभा निवडणूक 2024 : महाविकास आघाडीतील बंडखोर घेणार अर्ज मागे; संजय राऊत यांना ठाम विश्वास - MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024

महाविकास आघाडीतील बंडखोर उमेदवारी अर्ज मागे घेतील, अशी माहिती उबाठा खासदार संजय राऊत यांनी मुंबईत दिली. आमच्यात कुठेही मैत्रिपूर्ण लढती होणार नाहीत, असंही त्यांनी सांगितलं.

Maharashtra Assembly Election 2024
संपादित छायाचित्र (ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 4, 2024, 2:28 PM IST

मुंबई :आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीचे सर्वच बंडखोर त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेणार असल्याचा ठाम विश्वास उबाठा खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. मागील चार दिवसांपासून उबाठाचे प्रमुख नेते बंडखोर उमेदवारांच्या संपर्कात असून त्यात त्यांना यश आल्याने हे बंडखोर उमेदवार त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतील. हे चित्र दुपारपर्यंत स्पष्ट होईल, असंही संजय राऊत म्हणाले. त्याचबरोबर महाविकास आघाडीने शेतकरी कामगार पक्षाला अलिबाग, पनवेल आणि पेण या तीन जागा सोडल्याने या तिन्ही जागांवरील त्यांचे उमेदवार माघार घेतील, असेही संजय राऊत यांनी यावेळी स्पष्ट केलं.

आमच्यात कोणत्याही मतदारसंघांमध्ये संघर्ष होणार नाही : याप्रसंगी बोलताना संजय राऊत म्हणाले की, "मागील चार दिवसापासून महाविकास आघाडीतील प्रमुख नेते बंडखोर उमेदवारांच्या संपर्कात होते. काल दिवसभर सुद्धा त्यांनी प्रमुख नेत्यांशी चर्चा केली. महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये कोणत्याही मतदारसंघांमध्ये संघर्ष होणार नाही. आमच्या घटक पक्षात कुठेही एकमेकांशी लढत होणार नाही. माकप नेते कॉम्रेड कराड यांनी माझी भेट घेतली. त्यांनी नाशिकमधून उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याची विनंती करण्यात आली आहे. त्याचबरोबर आमच्यामध्ये कुठेही मैत्रीपूर्ण लढत होणार नाही," असंही संजय राऊत म्हणाले.

जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर करण्याची गरज नाही :महायुतीमधील अंतर्गत वादावर संजय राऊत यांनी भाष्य केले. संजय राऊत म्हणाले की, "महायुतीमधील शिंदे आणि अजित पवार गटाने भरमसाठ एबी फॉर्मचे वाटप केले आहे. परंतु आमच्याकडे असं झालं नाही. आम्ही महाविकास आघाडीमध्ये असून शेवटपर्यंत आघाडीधर्म पाळणारे आहोत. भाजपासोबत युतीमध्ये असताना सुद्धा युतीधर्माचं पालन आम्ही केलं. शेकापचे जयंत पाटील यांच्याबरोबर काल रात्री चर्चा झाली. या चर्चेमध्ये अलिबाग, पनवेल, पेण या 3 जागा शेकापला सोडण्याचं ठरलं. त्याप्रमाणे या तीन जागांवरील आमचे शिवसेनेचे उमेदवार माघार घेतील. त्याचप्रमाणे जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर करण्याची काही गरज नाही. आम्ही एकत्र लढत आहोत," असेही राऊत म्हणाले.

मनोज जरांगे पाटील यांचा राजकीय नाही, तर सामाजिक लढा :मराठा नेते मनोज जरांगे यांनी निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, "मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांचा संघर्ष सातत्याने सुरू आहे. हा संघर्ष त्यांच्या समाजाच्या विकासासाठी आणि उद्धारासाठी असून यासाठी त्यांनी आपल्या प्राणांची बाजीही लावली आहे. हे आपणाला मान्य केलं पाहिजे. याकरता समाज सुद्धा त्यांच्या पाठीशी एक संघपणे उभा असून निवडणुकीविषयी त्यांनी काय निर्णय घ्यावा, हा त्यांचा निर्णय आहे. मनोज जरांगे यांची सामाजिक चळवळ असून आम्ही त्याला राजकीय लढा मानत नाही. तर तो एक सामाजिक लढा आहे. याकरता जरांगे यांनी काय भूमिका घ्यावी? हा त्यांचा प्रश्न असून आम्ही याबाबत त्यांना काही मार्गदर्शन करणार नाही. परंतु त्यांच्या लढ्याला आमचं कायम पाठबळ असेल," असेही संजय राऊत म्हणाले.

हेही वाचा :

  1. अरविंद सावंत चुकीचं काय बोलले? संजय राऊतांकडून पाठराखण
  2. आमचे फोन आजही टॅपिंग केले जातात, संजय राऊतांचा गंभीर आरोप
  3. भाजपाच्या 50 जागाही येणार नाहीत, तर एक दोन आमदार येतील म्हणून मनसेची भाजपाशी जवळीक; संजय राऊतांचा हल्लाबोल

ABOUT THE AUTHOR

...view details