नागपूरMahayuti Seat Allocation : लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाचा तिढा सध्या महायुतीमध्ये सुरू आहे. यावर देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाष्य केलंय. "भाजपानं जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील २० उमेदवारांची घोषणा केलीय. उर्वरित उमेदवारांची घोषणा देखील येत्या काळाला होईल. गेल्यावेळी भाजपाकडून २५ जागा लढवण्यात आल्या होत्या. त्यानुसार आधी २५ उमेदवार जाहीर होणे अपेक्षित आहे. त्यानंतर नव्यानं भाजपाच्या वाट्याला येणाऱ्या मतदारसंघात उमेदवार जाहीर होईल," अशी माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. फडणवीस आणि बावनकुळे हे दोघेही नागपुरात बोलत होते.
केंद्रीय नेतृत्व निर्णय घेणार : "कुणाला कुठून उमेदवारी द्यायची आहे याबाबत केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड निर्णय घेईल. गेल्यावेळी आम्ही २५ जागा लढवल्या होत्या. केंद्रीय नेतृत्व त्यासंदर्भात चर्चा करून अंतिम यादी जाहीर करेल. सर्व घटकांना सन्मानजनक जागा मिळतील आणि आम्ही ४५ जागा जिंकु हा आमचा अहंकार नाही तर विश्वास आहे," असं बावनकुळे म्हणाले.
मनसेबरोबर युती? : "विकसित भारत संकल्पना साधण्यासाठी इतर घटक पक्ष सामील होणार असेल तर हरकत नाही. राज ठाकरे आणि भाजपाचे विचार सारखे आहेत," असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. तर "मनसे संदर्भात आज मी अधिकारीक स्वरूपात काहीही बोलू शकत नाही. मला वाटतं की चर्चा खूप होत आहेत. या संदर्भात निर्णय झाला तर आम्ही तुम्हाला सांगू," असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.