मुंबई-कधी काळी भारतावर इंग्रजांचं राज्य होतं, त्याच काळात रतन टाटा यांचा जन्म झाला. 1937 मध्ये जन्मलेल्या रतन टाटा यांनी ब्रिटिश भारतातील त्यांच्या आठवणी शेअर केल्यात. एका मुलाखतीदरम्यान त्यांनी सांगितले होते की, लहानपणी भारताला गुलामीत पाहताना अस्वस्थ वाटायचे. त्यांना भारताचे स्वातंत्र्य पाहायचे होते. रतन टाटा यांचे घर तत्कालीन मुंबईतील आझाद मैदानाजवळ होते. रतन टाटा सांगतात की, ते अनेकदा त्यांच्या घराच्या बाल्कनीतून आझाद मैदानातील हालचाली पाहत असत. जिथे अनेकदा स्वातंत्र्यसैनिकांचं आंदोलनही व्हायचं, नेते यायचे आणि भाषणंही व्हायची आणि त्याच वेळी त्यांची ब्रिटिश सैनिकांशी चकमक व्हायची. रतन टाटा यांनी त्यांच्या घरातून अनेकदा लाठीचार्ज, दंगल आणि हिंसाचाराची चित्रे आझाद मैदानात पाहिली आहेत.
ब्रिटिशांच्या वाहनांच्या टाक्यांमध्ये साखर टाकायचो: बीबीसीसाठी पत्रकार करण थापर यांनी घेतलेल्या मुलाखतीदरम्यान रतन टाटा म्हणाले होते की, ते त्यांच्या सहकाऱ्यांबरोबर मिळून ब्रिटिश वाहनांच्या इंधनाच्या टाक्यांमध्ये साखर टाकत असत. खरं तर तो इंग्रजांविरुद्ध प्रतिकाराचा केलेला बालिश प्रकार होता, असंही त्यांनीच मान्य केलं होतं. "मला स्वातंत्र्य चळवळीतील अनेक गोष्टी आठवत नाहीत, पण दंगली आठवतात, माझ्या कुटुंबाचे घर आझाद मैदानाजवळच्या गल्लीत होते, या आझाद मैदानात अनेक सभा होत असत. लाठीचार्ज म्हटला तर मला आजही आठवतं की, मी माझ्या बाल्कनीतून हे सगळं पाहत असायचो." ब्रिटिशांनी भारत सोडून त्यांच्या देशात म्हणजेच इंग्लंडमध्ये परत जावे, अशी रतन टाटांची तेव्हा इच्छा होती. यासाठी ते त्याच्या मित्रांसोबत काही ना काही करामती करायचे. रतन टाटा म्हणाले होते की, "मला आठवतंय, आम्ही मुलं ब्रिटिश खासदारांच्या गाड्या आणि मोटारसायकलच्या पेट्रोल टाकीत साखर टाकायचो, जेव्हाही आम्हाला संधी मिळेल, तेव्हा आम्ही अशा गोष्टी करायचो." रतन टाटा सांगत होते की, त्यांनी अनेक ब्रिटिश कारमधील पेट्रोलच्या टाकीत साखर टाकलीय.
टाक्यांमध्ये साखर टाकली तर काय? : खरं तर कोणत्याही वाहनाच्या इंधन टाकीमध्ये साखर टाकणे हे मशीन खराब करण्यासाठी पुरेसं आहे. साखर इंधन फिल्टर बंद करू शकते, इंधन पुरवठा खंडित करू शकते, तसेच इंजिन थांबवू शकते. साखर गाडीतील एअर फिल्टरला अडथळा आणू शकते, ज्यामुळे हवेचा प्रवाह कमी होतो आणि इंजिनचे नुकसान होऊ शकते. एकंदरीतच एकदा साखर इंजिनामध्ये गेली तर ते बंद होणारच आहे.