हैदराबाद Ramoji Rao no more -रामोजी ग्रुप ऑफ कंपनीजचे संस्थापक रामोजी राव यांचं 8 जून रोजी निधन झालं. वयाच्या 88 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कलात्मक दूरदृष्टी लाभलेल्या या प्रति विश्वामित्रानं रामोजी फिल्म सिटी या जगातील सर्वात मोठ्या फिल्म स्टुडिओ कॉम्प्लेक्सची निर्मिती करुन चित्रपट उद्योगात मोठं योगदान दिलं. चित्रपटासाठी लागणारे सर्व प्रकारचे खरेखुरे सेट्स, बाग-बगिचे, भव्य बिग फ्लोअर्स स्टुडिओपासून अगदी रुग्णालय, जेल, पोलीस स्टेशन, वाडे, जुनी गावं, मेट्रो शहरातील रस्ते ते विमानतळापर्यंत सगळं काही एकाच ठिकाणी उभं करुन चित्रपट निर्मितीचा मार्ग सुकर केला. रामोजी राव यांचा मूळ पिंड पत्रकारितेचा, परंतु त्यांनी वर्तमान पत्र, मासिकं, वृत्त वाहिन्यांपासून ते फिल्म, हॉटेल, चिटफंड, फुड इंडस्ट्रीपर्यंत अनेक यशस्वी उद्योग उभे केले. या सर्व उद्योगांमध्ये एका गोष्टीचं साम्य त्यांनी सातत्यानं बाळगलं की, नवा उद्योग सुरू करताना नवी प्रतिभावान माणसं शोधायची, त्यांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन द्यायचं आणि एक सजग निर्मिती करायची. वर्तमानपत्र, वृतवाहिन्यांसह सर्वच उद्योगात त्यांनी हा कटाक्ष कायम पाळला. त्यांचा हाच दृष्टीकोन फिल्म उद्योगातही दिसून येतो.
साऊथची फिल्म इंडस्ट्री अतिशय जोमात असण्याचा तो काळ होता. 80 च्या दशकात प्रेक्षकांचं निव्वळ मनोरंज करण्यासाठी अनेक निर्माते त्याकाळात पुढं येत होते. सुरुवातीच्या काळात पौराणिक चित्रपटांची लाट होती. परंतु ती लाट मनोरंजनाच्या नावानं आणि केवळ नफ्याच्या हेतूनं कधी मारधाड करणाऱ्या हिंसक चित्रपटाकडे वळली, हे प्रेक्षकांसह निर्मात्यांनाही कळलं नाही. असे चित्रपट कुटुंबासह पाहणं मुश्किल होऊन बसलं. अशावेळी रामोजी राव यांनी दर्जेदार कथा कुटुंबासह एकत्र पाहता येतील अशा चित्रपटांच्या निर्मितीसाठी प्रॉडक्शन हाऊस सुरू केलं. 1984 मध्ये 'श्रीवरिकी प्रेमलेखा' हा सामाजिक विषयावरील पहिला विनोदी चित्रपट बनवला. त्यांच्या या पहिल्याच प्रयत्नाला प्रेक्षकांनी उचलून धरलं आणि समीक्षकांनीही त्याची प्रशंसा केली. या चित्रटाला साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील सर्वोच्च 'नंदी अवॉर्ड' हा पुरस्कार मिळाला आणि रामोजी राव यांचा निर्माता म्हणून उदय झाला. तेलुगुमधील नामवंत लेखकांच्या उत्तम कथा कादंबऱ्यावर चित्रपट निर्मितीसाठीचा सिलसिला त्यांनी जारी ठेवला आणि गेल्या 40 वर्षात तेलुगु, तमिळ, कन्नड, मराठी, बंगाली, मल्याळम, हिंदी या भाषेत 65 हून अधिक चित्रपटांची निर्मिती केली.
रामोजी राव यांनी जेवढे म्हणून चित्रपट निर्माण केले त्यामध्ये कुठेही हिंसा, बिभत्सपणा, चावट विनोद यांना थारा दिला नाही. चित्रपट निर्माण झाल्यानंतर सेन्सॉरला संमतीसाठी पाठवण्यापूर्वी ते त्यांच्या प्रीव्ह्यू थिएटरमध्ये स्वतः पाहायचे आणि एखादा चित्रपटातील प्रसंग त्यांना पटला नाही तर त्याला कात्री लावण्याचा आदेश द्यायचे. मग तो सीन बनवण्यासाठी किती खर्च झाला याची फिकीर ते बाळगत नसत. खरं तर त्यांच्या चित्रपटाचे ते स्वतःच पहिले सेन्सॉर असायचे. आपला चित्रपट पाहताना तो कुणालाही खटकणार नाही याची दक्षता ते घ्यायचे.