नागपूर Ram Halwa in Nagpur : आयोध्येत श्रीराम मंदिरात आज प्रभू श्रीरामाची प्रतिष्ठापना होत असल्याच्या आनंदात नागपूरच्या कोराडीच्या महालक्ष्मी मंदिरात तब्बल 6 हजार किलोचा रामशिरा तयार करण्यात आलाय. शेफ विष्णू मनोहर यांच्या पुढाकारानं सहा हजार किलोचा रामशिरा तयार करण्यात आलाय. हा शिरा सुमारे 30 हजार लोकांना वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आलाय.
सहा हजार किलोचा राम हलवा : महालक्ष्मी जगदंबा संस्थान कोराडीचे अध्यक्ष तथा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि संस्थान विश्वस्तांच्या पुढाकारानं तसंच विमलादेवी जैन ट्रस्ट आणि डी.पी. जैन यांच्या सहकार्यानं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील रामशिरा बनवण्यात आपलं योगदान दिलंय. कोराडीचं श्री महालक्ष्मी जगदंबा मंदिर परिसरातील पुरातन मंदिर आहे. शिवाय या परिसरातच रामायण सांस्कृतिक केंद्रही उभारण्यात आलंय. सर्वत्र श्रीरामाची भक्ती आणि जयघोष सुरू आहे. त्यानिमित्तानं कोराडीच्या श्री महालक्ष्मी जगदंबा मंदिर इथं 6 हजार किलोचा रामशिरा तयार करण्यात आलाय. महालक्ष्मी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या 30 हजार श्री रामभक्त हे राम शिरा ग्रहण करतील.